हातात आलेले धानपिक पावसाने हिरावले : कर्जाच्या चिंतेत ६५ वर्षीय शेतकऱ्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, हातात आलेले धानपीक पावसाअभावी उद्ध्वस्त आणि डोक्यावर खासगी मायक्रो फायनान्सचे कर्ज या संकटांच्या विळख्यात सापडलेल्या नागभिड तालुक्यातील मींथुर येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. मुखरू लक्ष्मण दडमल असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागभीड तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मींथुर गावातील मुखरू दडमल यांची यंदाच्या हंगामातील धानपिकाकडून मोठी आशा होती. मात्र, पावसाअभावी हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे शेतीचे नुकसान, दुसरीकडे मायक्रो फायनान्सचे कर्ज आणि घरखर्चाची चिंता, अशा दुहेरी संकटात ते सापडले होते. शेतीतून उत्पन्नच मिळाले नाही, तर कर्जाची परतफेड करायची कशी आणि कुटुंबाचा संसार चालवायचा कसा, या विवंचनेत ते होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष मदत किती आणि कधी मिळणार, हा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्यांसमोर कायम आहे. निसर्गाच्या अवकृपेने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान मुखरू दडमल यांनी गावातील तलावात उडी घेतल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजल्यापासून तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली. दिवसभराच्या शोधानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.
मुखरू दडमल यांच्या मृत्यूने एका शेतकरी कुटुंबाचा आधार हरपला असून, त्यांच्या पश्चात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतातील पीक वाया गेले, कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि भविष्याची चिंता सतावत असताना घडलेल्या या घटनेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




