विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता :अजय कंकडालवार


- आलापल्लीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शिनीचे आयोजन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी : 
आज स्पर्धेचे युग आहे.  स्पर्धेच्या  युगात टिकायचे असल्यास व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करायचे असल्यास विज्ञान प्रदर्शनांची अत्यंत आवश्यकता आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष विज्ञान प्रतीकृती तयार करून ते हाताळतात.  त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होते.  यातुनच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होते. म्हणून सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदर्शनात  सहभागी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
पंचायत समीती अहेरी च्या  शिक्षण विभागातर्फे  तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शिनीचे आलापल्ली येथील  राणी दुर्गावती विद्यालयात आज  १५ डिसेंबर रोजी    जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यस्थानी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम   होत्या. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या सुनिता कुसनाके, उपसभापती राकेश तलांडे, प.स.सदस्या गीताताई चालुरकर, भास्कर तलांडे, गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य, शाळेचे मुख्याध्यापक गजानन लोणबले , तालुका समन्वयक प्रकाश दुर्गे उपस्थित होते.   विज्ञान प्रदर्शनाकरिता जिल्हा परिषदे मार्फत यावर्षी प्रत्येक तालुक्याला पंचेविस हजार रुपये वाढवून दिल्याची माहिती उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली.
 यावेळी उपस्थितांना  उपसभापती राकेश तलांडे, तालुका समन्वयक  प्रकाश दुर्गे, प्राचार्य गजानन लोनबले, प.स.सदस्य भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन  केले.  कृषी,आरोग्य व स्वच्छता, वाहतुक व दळणवळण , संसाधनाचे व्यवस्थापन, कचऱ्याचे  व्यवस्थापन व गणितीय प्रतिकृती या विषयावर विज्ञानाच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. यात माध्यमिक विभागातुन ३७ प्रतीकृती तर प्राथमिक विभागातून ३६ प्रतिकृती ठेवण्यात आल्या.
या तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शिनीला तालुक्यातील साठच्या  वर शाळांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गणेश पहापडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार प्रा.प्रमोद मेश्राम यांनी मानले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-15


Related Photos