जी-२० ची तयारी : महापालिकेच्या मुख्यालयाचा होतोय मेकओव्हर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : उपराजधानीत येत्या २१, २२ मार्च रोजी जी-२० ची बैठक होणार आहे. त्यासाठी नागपूर शहराबरोबरच महापालिकेच्या मुख्यालयातही सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येत आहे.
महापालिकेच्या मुख्यालय परिसरात सौंदर्यीकरणाचे काम जोरात सुरू आहे. जी-२० निमित्य बंद पडलेले कारंजे पुन्हा सुरू होणार आहे. लॉनमध्ये हिरवळ फुलणार आहे, रंगीबेरंगी फुलांनी महापालिकेचा परिसर सजणार आहे.
मुख्यालयाच्या इमारतीसमोरील उद्यान १७ वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते, आता त्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याभोवती हिरवळ करण्यात येत आहे. परिसरात लँडस्केपिंग आणि सुरक्षा कुंपणाचे बांधकाम करण्यात येत आहे. जी-२० टीम नागपुरात दाखल होण्यापूर्वी संपूर्ण काम पूर्ण होईल, असा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी लावलेली फुलझाडे गायब
महापालिकेत २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी शेकडो फुलझाडांनी उद्यान सजविण्यात आले होते. पण जी-२० च्या कामासाठी उद्यानात हिरवळ तयार करण्यासाठी ही फुलझाडे काढून टाकण्यात आली. जी-२० साठी महापालिकेचा परिसर चकाचक होत असताना बाजूलाच असलेली मनपाची इमारत जरजर झाली आहे. तिच्याकडे मात्र दुर्लक्ष आहे.
News - Nagpur