ब्रम्हपुरी, पडोली पोलिसांनी केली दारूतस्करांविरूध्द कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी आणि पडोली पोलिसांनी दारू तस्करांवर कारवाई केली असून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आज २१ सप्टेंबर रोजी ब्रम्हपुरी पोलिस पेट्रोलिंग करीत असताना काही इसम चारचाकी वाहनाद्वारे तोरगाव खुर्द कडून ब्रम्हपुरीकडे दारूची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तोरगाव खुर्द येथे सापळा रूचन स्काॅर्पिओ वाहनास ताब्यात घेवून झडती घेतली. वाहनात १० लाखांची देशी दारू आढळून आली. दारू तस्करीकरीता वापरलेली एमएच २८ व्ही ७७८७ क्रममांकाची  ८ लाखांची स्काॅर्पिओ व दारू मिळून एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी पोलिसांनी केली आहे.
दुसऱ्या कारवाईत पडोली पोलिसांनी १२ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर - चंद्रपूर मार्गावर दारू तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून स्वीफ्ट डिझायर वाहन क्रमांक एमएच ३० टी ३३८३ ला पकडले. वाहनात १ लाख ९० हजारांची दारू आढळून आली. या कारवाईत वाहनासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पिक अप वाहन क्रमांक एमएच २७ बीएक्स १९०२ ची झडती घेतली असता ३ लाखांची दारू आढळून आली. वाहनाची किंमत ४ लाख रूपये असून ४ मोबाईल संचासह १२ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
या कारवाईत मंगेश भास्कर वड्डे रा. यवतमाळ, परवेश खान लतीफ खान रा. यवतमाळ, अंकीत दिलीप गजबिये रा. यवतमाळ या आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी गायगोले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-21


Related Photos