गडचिरोलीत भव्य गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५ चे आयोजन


- १४ हजारांहून अधिक धावपटूंचा राहणार सहभाग, नामवंत कलाकारांचीही उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. पोलीस दादालोरा खिडकी व प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ देत विकासाच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. याच अनुषंगाने आदिवासी संस्कृतीचे जतन, कलागुणांना व्यासपीठ व नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
२५ ते २७ डिसेंबर २०२५ दरम्यान शासकीय कृषी महाविद्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली महोत्सव, तर २८ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात महामॅरेथॉन २०२५ (सिझन-३) होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या गडचिरोली महोत्सवात आदिवासी समूह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा हे प्रमुख आकर्षण ठरणार असून दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील विविध बचत गट, संस्था व हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. २६ व २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून यामध्ये सुरेश वाडकर, भारत गणेशपूरे, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, ममता उईके, निरंजन बोबडे, माधुरी पवार, पद्मनाभन गायकवाड व अर्जुन धोपटे यांचा समावेश आहे. स्थानिक कलाकारांनाही आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, महामॅरेथॉन २०२५ मध्ये जिल्ह्यातील १४ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असून २१ किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमी अशा विविध अंतरांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सहभागी धावपटूंना टी-शर्ट, मेडल, हुडी बॅग, प्रमाणपत्र, झुंबा सेशन व अल्पोपहार देण्यात येणार आहे. विजेत्यांसाठी पुरुष व महिला प्रवर्गात एकूण ४ लाख १४ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या भव्य उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळाडू व कलाकारांचा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. या महोत्सव व महामॅरेथॉनची संपूर्ण तयारी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुलराज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




