महत्वाच्या बातम्या

 मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन संविधानाचे महत्व सांगणारे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 


- विद्यार्थी व नागरीकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : दुर्मिळ छायाचित्रांद्वारे संविधानाच्या निर्मितीचा इतिहास व माहितीचे महत्व सांगणारे भारताचे संविधान मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले असून जिल्ह्यातील नागरीक व विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे केले.
संविधान दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात भारताचे संविधान या विषयावर आयोजित केलेल्या मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे फित कापून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, जात पडताळणी समितीचे उपायुक्त शरद चव्हाण, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, सामाजिक न्यायचे सहायक आयुक्त पी. बी. कुलकर्णी, समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कर्डिले पुढे बोलतांना म्हणाले की, संविधानाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला अनेक पुस्तके वाचावी लागतात, मात्र या प्रदर्शनाच्या माध्यमातून संविधानाची माहिती एका ठिकाणी मिळत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुताची शिकवण संविधानाद्वारे देण्यात आली आहे. जगातील सर्वोत्तम असे भारतीय संविधान आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी निश्चितच फायदा होणारी माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
भारत हा स्वतंत्र झाला तरी एकसंघ राहू शकणार नाही, असे त्यावेळी विदेशी शक्तींकडून बोलले जात होते, मात्र आपल्या संविधानाच्या शक्तीमुळे आज आपला भारत देश संविधानाच्या माध्यमातून एकसंघ राहून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे संविधानाचे महत्व आपण भारतीय म्हणून जाणून घेणे आवश्यक आहे. नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शन स्थळाला भेट देऊन संविधानाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी यावेळी केले.
डॉ. गायकवाड म्हणाले की, 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच उदघाटनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले. भारत सरकारच्या भारताचे संविधान या मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांना आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. सरकारने संविधानाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध पुस्तके प्रकाशित केले आहेत. नागरीकांनी आपल्या अधिकाराची माहिती जाणून घेण्यासाठी संविधान वाचन करणे आवश्यक आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिलेल्या दुर्मिळ माहितीच्या आधारे संविधानाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी भारताचे संविधान या प्रदर्शनात संविधानाची माहिती सांगणारे दुर्मिळ छायाचित्र व ऐतिहासिक माहिती, डिजीटल स्वरूपातील माहिती दृकश्राव्य माध्यमातून नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले. हे प्रदर्शन 28 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. नागरीक व विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन समाज कल्याण निरीक्षक प्राजक्ता सोनुने यांनी केले, तर आभार सहायक आयुक्त पी. बी. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमात व प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध महाविद्यालय, शाळा येथील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos