नारायणपूर चकमध्ये वृद्ध महिलेची हत्या : आरोपी दोन दिवसापासून फरार


- शेतातून परतताना दगडाने ठेचून हत्या; न्यायवैज्ञानिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी, हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घोट(चामोर्शी) : चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर चक क्र. २ येथे शेतातून घरी परतणाऱ्या वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याच्या घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या हत्येचे गूढ अधिकच वाढले असून, मारेकरी कोण आणि हत्येमागील कारण काय, याबाबत पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली.
मृत महिलेचे नाव गोपिका असल्याचे समोर आले आहे. त्यांचे पती रामचंद्र हे देवदर्शनासाठी वृंदावन येथे गेले होते. गोपिका यांना दोन मुले असून, मोठा मुलगा प्रकाश हा घोट येथे कुटुंबासह राहतो. तर धाकटा मुलगा प्रांजीत हा जून २०२३ मध्ये चालक पोलिस अंमलदार म्हणून पोलिस दलात भरती झाला असून, तो पत्नीसमवेत अहेरी येथे राहतो.
रात्रीपर्यंत घरी न परतल्याने शोध सुरू -
गोपिका ५ सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध घेत असताना जंगलातील पायवाटेपासून सुमारे ४० ते ५० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर दगडाने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली.
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल -
या प्रकरणी प्रांजीत यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी न्यायवैज्ञानिक पथकाने पाहणी करून उपलब्ध पुरावे संकलित केले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाची परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे तपास केला जात आहे.
मात्र, घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांच्या हाती अद्याप ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे आणि हत्येमागील नेमके कारण उघड करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
हत्येमागील कारण काय -
गोपिका यांची हत्या वैयक्तिक वादातून झाली की पूर्ववैमनस्यातून, अथवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याचा तपास पोलिस करीत आहेत. शेतातून घरी परतताना त्यांच्यासोबत नेमके काय घडले, तसेच त्या कोणाच्या संपर्कात आल्या होत्या का, याचीही माहिती गोळा केली जात आहे.
मृत महिलेचा धाकटा मुलगा पोलिस दलात चालक पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत असल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
सर्व बाजूंनी तपास सुरू -
कल्पेश खरोडे, पोलीस निरीक्षक, घोट पोलिस मदत केंद्र यांनी सांगितले, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
नारायणपूर चक क्र. २ येथील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दोन दिवसांनंतरही आरोपीचा शोध लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. न्यायवैज्ञानिक तपासातून मिळणारे पुरावे आणि पोलिसांच्या पुढील तपासातून हत्येचे गूढ उकलण्याची अपेक्षा आहे.




Petrol Price




