५.४१ लाखांच्या गांजासह बिहारचा तस्कर जेरबंद


- वर्धा रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई; श्वान प्रिन्सच्या संकेताने १०.४७० किलो गांजा जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : मुंबईकडे जाणाऱ्या साप्ताहिक एक्स्प्रेसमधून गांजाची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी उधळून लावला. आरपीएफच्या श्वान पथकातील प्रिन्स याने दिलेल्या मादक पदार्थाच्या संकेतामुळे बी/२ कोचमध्ये असलेल्या संशयित बॅगेची झडती घेण्यात आली. त्यातून १०.४७० किलो ओलसर गांजा, ट्रॉली बॅग आणि दोन मोबाइल फोन असा एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बिहारमधील मनीष कुमार विश्वेश्वर शर्मा २९ वर्षे रा. पीसी कॉलनी, कंकडबाग, पाटणा याला अटक करण्यात आली आहे.
आरपीएफ सीआयबी आणि सीपीडी, नागपूरचे पथक श्वान प्रिन्ससह ट्रेन क्रमांक १२८७० मुंबई एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. गाडी सिंदी रेल्वे स्थानक पार करीत असताना बी/२ कोचमधील बर्थ क्रमांक ११ खाली ‘प्रिन्स’ने मादक पदार्थ असल्याचा सकारात्मक संकेत दिला. या संकेताच्या आधारे आरपीएफच्या पथकाने संबंधित बॅग आणि तिच्या मालकाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान मनीष कुमार विश्वेश्वर शर्मा याने ट्रॉली बॅगेत गांजा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
१० बंडलमधून गांजा जप्त -
ट्रेन वर्धा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पोहोचल्यानंतर आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक नुनदेव वासनिक यांनी राजपत्रित अधिकारी व शासकीय पंचांच्या उपस्थितीत ट्रॉली बॅगेची झडती घेतली. झडतीमध्ये बॅगेत सेलोटेपने गुंडाळलेले १० बंडल आढळून आले. त्यांचे वजन केले असता एकूण १०.४७० किलो ओलसर गांजा असल्याचे स्पष्ट झाले. जप्त गांजाची किंमत ५ लाख २३ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय १ हजार ५०० रुपये किमतीची ट्रॉली बॅग आणि दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले. त्यामुळे कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ४१ हजार रुपये इतकी आहे.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा -
या प्रकरणी वर्धा लोहमार्ग पोलिस ठाण्यात आरोपी मनीष कुमार शर्मा याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) आणि २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, गांजाचा पुरवठा कुठून झाला आणि तो नेमका कुठे पोहोचविण्यात येणार होता, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. रेल्वेतून अमली पदार्थांची वाहतूक करण्याचा प्रयत्न आरपीएफच्या श्वान पथकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. प्रिन्सने बर्थखाली मादक पदार्थ असल्याचा संकेत दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि बॅगेतील गांजा जप्त केला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलम डोंगरे करीत आहेत. आरोपीच्या चौकशीतून तस्करीमागील इतर व्यक्ती, गांजाचा स्रोत आणि संभाव्य वितरणाचे ठिकाण याबाबत अधिक माहिती मिळते का, याचा तपास सुरू आहे.




Petrol Price




