शिक्षकांसाठी तणावमुक्तीचा मंत्र


- इनरव्हील क्लब ऑफ वरोरातर्फे तणाव व्यवस्थापन सेमिनार; योग्य आहार, व्यायाम आणि विश्रांतीचे महत्त्व पटवून दिले.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ वरोराच्या वतीने अरविंद निकेतन स्कूल येथे शिक्षकांसाठी तणाव व्यवस्थापन सेमिनारचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांच्या दैनंदिन कामातील वाढता ताण, त्याचा आरोग्यावर तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फिटनेस ट्रेनर व न्यूट्रिशनिस्ट झैनब सॅडिकोट यांनी तणाव आणि त्याचा काम व जीवनावर होणारा परिणाम’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. अध्यापन क्षेत्रात काम करताना निर्माण होणारा मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
योग्य व संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप व विश्रांती तसेच काम आणि वैयक्तिक जीवनामध्ये योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तणावाकडे दुर्लक्ष न करता त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास कार्यक्षमता वाढण्यासोबतच मानसिक आरोग्यही चांगले राखता येते, याबाबत त्यांनी व्यावहारिक मार्गदर्शन केले.
मनोरंजक खेळांमुळे वातावरण झाले आनंदी -
सेमिनारदरम्यान क्लबच्या ISO शेंद्रे यांनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले. या खेळांमध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. दैनंदिन अध्यापनाच्या धावपळीतून काही काळ विरंगुळा मिळाल्याने शिक्षकांनी या उपक्रमाचा आनंद घेतला. विविध खेळांमध्ये विजयी ठरलेल्या शिक्षकांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाला प्राचार्य जुमडे सर आणि बोर्ड सदस्य नांदूरकर सर यांची विशेष उपस्थिती होती.
निरोगी शिक्षक, निरोगी शैक्षणिक वातावरण -
कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा संदेश देण्यात आला. निरोगी शिक्षकच निरोगी शैक्षणिक वातावरण घडवतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्नेहल पत्तीवार, सचिव प्राजक्ता कोहळे, उपाध्यक्षा प्रतिभा मणियार, झैनब सॅडिकोट, कविता बाहेती, माधवी शेंद्रे, प्रणाली बेदरकर, वैशाली पदमावर यांच्यासह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती. शिक्षकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम शिक्षक दिनाच्या निमित्ताने उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला.




Petrol Price




