बियाणे, खते व कीटकनाशक विक्री परवाना प्रक्रिया झाली ऑनलाइन : घरबसल्या आपले सरकार पोर्टलवरून मिळणार परवाने


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील नवीन कृषी पदवीधारक आणि विद्यमान कृषी सेवा केंद्र चालकांसाठी बियाणे, खते, कीटकनाशके आणि कापूस बियाणे विक्रीचे नवीन परवाने मिळवणे, नूतनीकरण करणे किंवा दुरुस्ती करण्याची संपूर्ण प्रक्रिया आता आपले सरकार पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. यामुळे अर्जदारांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरलेली नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस आणि पारदर्शक झाली आहे.
ज्या कृषी सेवा केंद्र चालकांनी अद्याप आपल्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही किंवा परवान्यात सुधारणा करणे बाकी आहे, अशा सर्व परवानाधारकांनी पुढील १५ दिवसांत ऑनलाइन अर्ज करून परवाने अद्ययावत करावेत, अन्यथा संबंधित केंद्रांवर कृषी विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
शासनाने निर्धारित केलेले शुल्क ऑनलाइन ग्रास प्रणालीद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांच्या नावे भरून ते चलन पोर्टलवर अपलोड करावे लागेल. नवीन परवान्यासाठी कापूस बियाण्याकरिता ५०० रुपये व इतर बियाण्यांसाठी १ हजार रुपये, खते विक्रीसाठी किरकोळ विक्रेत्यास ४५० रुपये व घाऊक विक्रेत्यास २ हजार २५० रुपये आणि कीटकनाशक विक्रीसाठी ७ हजार ५०० रुपये शुल्क आहे.
परवाना नूतनीकरणासाठी कापूस व इतर बियाण्यांना प्रत्येकी ५०० रुपये तसेच रासायनिक खतांच्या किरकोळ ४५० व घाऊक परवान्यासाठी २२५० शुल्क लागू राहील. दुरुस्तीसाठी कापूस बियाणे १०० रुपये, इतर बियाणे ५०० रुपये, खते किरकोळ ३० रुपये, घाऊक १५० रुपये आणि कीटकनाशकांसाठी ३०० रुपये शुल्क आकारले जाईल.
अर्ज दाखल केल्यानंतर तीन टप्प्यांत तपासणी केली जाईल. तपासणी यशस्वी झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने परवाना थेट अर्जदाराच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. नवीन कृषी पदवीधरांनी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि जुन्या विक्रेत्यांनी परवाने अद्ययावत करण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




