मालगाडीच्या धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू


- गोंदिया-नागभीड-बल्लारशाह रेल्वेमार्गावरील सिंदेवाही-राजोलीदरम्यान घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह - गोंदिया रेल्वेमार्गावर गुरुवारी सकाळी मालगाडीच्या धडकेत एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना सिंदेवाही व राजोली रेल्वे स्थानकादरम्यान किलोमीटर क्रमांक ११८१/८ जवळ सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार, वाघ रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव मालगाडीची जोरदार धडक बसली. या धडकेत वाघाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत वाघ प्रौढ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर वाघाचे वय व इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, जंगल परिसरातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गावर वन्यप्राण्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




