महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मार्गदर्शनपर कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासह व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा कार्यक्रमाचा उद्देश होता.

आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप गोंड उपस्थित होते. यावेळी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा जीवतोडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. दुर्गेश साठवणे आणि सहाय्यक प्राध्यापिका समीक्षा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. दुर्गेश साठवणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. नेहा जीवतोडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे सांगत सेवाभाव, नेतृत्वगुण, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख अतिथी डॉ. कुलदीप गोंड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी तसेच योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची आणि उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी स्वयंसेविका नीलिमा पोटे आणि स्नेहा निरांजने यांनी आपले अनुभव विद्यार्थिनींसमोर मांडले. राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागामुळे व्यक्तिमत्त्व विकासासोबतच सामाजिक कार्याची जाणीव आणि विविध क्षेत्रांतील अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रीती कोसरया यांनी केले, तर निधी पोटे यांनी आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांच्या टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली.





  Print






Related Photos