स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत नाही


- विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांचा आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नुकतेच राज्य शासनाने राज्यातील १५४ तालुके टंचाईग्रस्त म्हणून घोषित केले. या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नसताना तसेच पावसाने दगा दिल्याने धान पिक करपले असताना एकही तालुका टंचाईसदृश्य तालुक्यांच्या यादीत नाही. याला केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींचे दूर्लक्षच कारणीभूत आहे, असा आरोप काॅंग्रेसचे विधीमंडळ उपगटनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आ.विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेला जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम, डाॅ. नितीन कोडवते उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजपाला जनतेशी बांधीलकी नाही तर केवळ मतांशी बांधिलकी आहे. यामुळेच जनतेच्या प्रश्नांकडे दूर्लक्ष केले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही मोठे धरण नाही. तसेच सिंचनाच्या कोणत्याही शाश्वत सुविधा नाहीत. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३३ टक्के कमी पाऊस कोसळला. मागीलवर्षीच्या तुलनेत आता जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरने खालावली आहे. एटापल्ली, गडचिरोली, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यात पाण्याची पातळी सर्वाधित खालावली आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची या तालुक्यातील धान पूर्णपणे करपला आहे. असे असतानाही गडचिरोली जिल्हा दुष्काळसदृश्य नाही, हे कितपत योग्य आहे.
पिकाचे तीन टप्प्यात सर्व्हेक्षण केले जाते. पहिला  पऱ्हे टाकणीनंतर आणि दुसरा सर्व्हे रोवणीनंतर करण्यात आला. यामध्ये अधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल पाठविला. आता धान कापणीनंतरचा तिसरा सर्व्हे  होतो. या सर्व्हेचा कोणताही उपयोग नाही. तसेच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तालुके टंचाईसदृश्य जाहिर करण्यात आले. मग गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईसदृश्य का नाही, असा प्रश्न आ. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले असते तर शेतकऱ्यांच्या हिताचे झाले असते, असेही आ.वडेट्टीवार म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-01


Related Photos