महत्वाच्या बातम्या

 मुंबईतून तब्बल दोनशे पोलिसांची बदली : मॅटचे आयुक्तांना आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतील सुमारे दोनशे पोलीस येत्या दोन महिन्यात त्यांची बदली झालेल्या ठिकाणी रुजू होतील. त्यांची बदली होऊनही पोलीस आयुक्त त्यांना कार्यमुक्त करत नव्हते. बदली झालेल्या पोलिसांना येत्या दोन महिन्यात मुंबईतून कार्यमुक्त करा, जेणेकरुन ते बदली झालेल्या ठिकाणी रुजू होऊ शकतील, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

हे आदेश म्हणजे मुंबई पोलीस आयुक्तांना दणका मानला जात आहे.

राज्य शासनाने २०२२ मध्ये पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या. सेवेत ८ वर्षे पूर्ण झालेल्यांची बदली करण्याचा नियम आहे. कुटुंबामध्ये काही अडचण असेल तरीही बदली केली जाते. त्यानुसार काही पोलिसांनी बदलीसाठी अर्ज केले. जे पोलीस नियमांची अट पूर्ण करत होते, त्यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात ही बदली करण्यात आली. मात्र त्यांना मुंबईतून कार्यमुक्त करण्यात येत नव्हते. त्यामुळे त्या पोलिसांनी मॅटसमोर अर्ज केला. मॅटचे सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली.

मुंबईसाठी मंजूर पोलीस पदे २२१६७ आहेत. त्यातील ६३६७ पदे रिक्त आहेत. सन २०२२ मध्ये १८१७ पोलिसांना मुंबईतून कार्यमुक्त करण्यात आले. राज्य शासनाच्या नियमानुसार एकूण पोलीस पदांच्या केवळ ५ टक्केच पोलिसांना कार्यमुक्त करता येते. त्यानुसार १८१७ पोलिसांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच पोलीस खात्यात मनुष्यबळाचीही कमतरता आहे. त्यामुळे अजून अधिक पोलिसांना कार्यमुक्त करता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र पोलीस आयुक्त यांनी मॅटसमोर सादर केले.

पोलीस महासंचालक यांनीही या अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर केले. मुंबई पोलीस दलासाठी १९३० जणांची भरती झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना २८ मार्च २०२२ रोजी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यातील ५४६ जण हे मुंबई पोलीस दलात रुजू झाले आहेत.

नवीन ५४६ जण मुंबई पोलीस दलात रुजू झाले आहेत. त्यामुळे आम्हाला मुंबई पोलीस दलातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी अर्जदारांनी केली. ते मान्य करत मॅटने या पोलिसांना येत्या दोन महिन्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले.

पोलीस आयुक्तांना फटकारले

पोलीस खात्यातील बदल्यांसाठी राज्य शासनाने नियम तयार केले. हे नियम पोलीस कल्याणासाठी आहेत. कुटुंबाची अडचण असेल तर बदली द्यावीच लागते. मुंबईत गर्दी वाढली आहे. त्यामुळे अर्जदार पोलिसांना मुंबईबाहेर बदली हवी आहे. अर्जदार बदलीचे सर्व निकष पूर्ण करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कार्यमुक्त न करण्याचा मुंबई आयुक्तांना निर्णय अन्यायकारकर व अमान्यच होणारा आहे, असे खडेबोल मॅटने सुनावले आहे. 






  Print






News - Rajy




Related Photos