महत्वाच्या बातम्या

 ३५ वे पक्षिमित्र संमेलन : माळढोक, सारसला वाचविण्यासाठी उपाय आणि चिंतन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे सुरू असलेल्या ३५ व्या पक्षिमित्र संमेलनात लुप्त होत असलेल्या माळढोक, सारस पक्षी वाचविण्यासाठी उपाय आणि चिंतन यावर चर्चा घडली. विशेष म्हणजे माळढोक विशेष यावर वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनचे शात्रज्ञ डॉ. सुतीर्था दत्ता यांनी मार्गदर्शन केले.

३५ व्या पक्षिमित्र संमेलनात ११ आणि १२ मार्च रोजी दोन दिवसीय विविध सत्रात सकाळ पासूनच विविध चर्चासत्रे झाली. माळढोक विशेष चर्चासत्रात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक नंदकिशोर काळे, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांची उपस्थिती होती. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनचे शात्रज्ञ डॉ. सुतीर्था दत्ता यांनी माळढोक पक्षी धोके आणि आशा यावर मार्गदर्शन केले. त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून देशभरातील माळढोक पक्ष्याच्या अधिवासावर माहिती दिली.

ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. डॉ. निनाद शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माळढोक पक्षी चर्चासत्रात अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक पक्ष्याची सद्यस्थिती सुधाकर कुऱ्हाडे यांनी मांडली, तर डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी विदर्भातील माळढोक पक्ष्याचा आढावा घेतला. अविनाश कुबल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात मनीष ढाकुळकर यांनी घुबड प्रजाती व शेतीतील महत्त्व, पाणथळ संवर्धन व रामसर स्थळ यावर डॉ. गजानन वाघ यांनी विस्तृत माहिती पीपीटीच्या माध्यमातून समजावून सांगितली. पक्षिमित्र संमेलनात विविध विषयावर चर्चासत्रे पार पडली.

यावेळी बहार नेचर फाउंडेशनचे दिलीप विरखडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित चर्चासत्रात औद्योगिक वसाहतीमुळे तलावावरील पक्ष्यावर झालेल्या परिणामाचा अभ्यास यावर किरण मोरे, पॅच मॉनिटरिंग, पक्ष्याच्या विविधतेच्या अभ्यास करण्यासाठी एक प्रभावी साधन यावर डॉ. चेतना उगले यांनी, तर डॉ. विनोद भागवत यांनी वन्यपक्षी आणि अदृश्य संकट यावर आपली माहिती सादर केली. सारस पक्षी चर्चासत्र प्रा. डॉ. गजानन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तर दिग्रस तलाव, पक्षी विविधतेसाठी स्वर्ग यावर राहुल वकारे, सारस पक्षी संरक्षण व संवर्धन यावर मुकुंद धुर्वे, गोंदिया सारस संवर्धन यावर सावन बाहेकर, भंडारा सारस एक प्रेमाचे प्रतीक यावर रवी पाठेकर यांनी माहिती दिली.





  Print






News - Chandrapur




Related Photos