मराठा आंदोलनातील मृतकाच्या कुटुंबीयांना मदत करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मराठा आंदोलनातील मृतकाच्या कुटुंबीयांना मदत करण्या संदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
मराठा नोंदी शोधण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
या समितीने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पहिला अहवाल शासनाला सादर केल्याचे शिंदे यांनी सांगितले. मराठा आंदोलनात अनेकांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ आत्महत्या केल्या. यातील अनेकांच्या घरच्या स्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत होती. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्या संदर्भातील प्रश्न सदस्यांनी विचारला हाेता.
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी गावात मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधी, मराठा संघटनांनी राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केल्याची माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली. अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अॅड. यशोमती ठाकुर, सुनील केदार, नाना पटोले, सुभाष धोटे आदींनी हा तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
News - Nagpur