महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : भूखंड हडपल्यावरून दोघांवर गुन्हा दाखल


- पैसे दिले दोघांनी, मात्र एकट्याच्याच नावाने केला भूखंड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एमआयडीसी मधील भूखंड खरेदीमध्ये गडचिरोली येथील अनुराग प्रमोद पिपरे यांची फसवणूक केल्या प्रकरणी गडचिरोली येथील तृप्ती बाबुराव राऊत (तृप्ती श्रीकांत भृगुवार) व विसापूर येथील अरुण मुका मून यांच्या विरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तृप्ती यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. तर मून हे फरार आहेत. अनुराग पिपरे यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनुराग पिपरे व तृप्ती राऊत हे एकवीरा मॅन्युफॅक्चरिंगचे समप्रमाण भागीदार होते. त्यांना व्यवसायाकरिता एमआयडीसी गडचिरोलीमध्ये भूखंड हवा होता. त्यांनी एमआयडीसीने लीजवर दिलेला ५४० चौरस मीटरचा भूखंड अरुण मुका मून यांचे कडून विकत घेतला.

भूखंडावर झालेले बांधकाम व लीजची किंमत असे मिळून ५ लाख ५० हजार रुपये किंमत ठरली. त्यापैकी ३ लाख ४७ हजार ३३० रुपये नगद स्वरूपात दिले. त्यानंतर अरुण मून व तृप्ती राऊत यांनी संगनमत करून सदर भूखंड तृप्ती राऊत यांच्या नावाने करून घेतला. तृप्ती राऊत यांनी गडचिरोली न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र तृप्ती राऊत या हजर होऊ शकल्या नाहीत. राऊत या ७ फेब्रुवारीला हजर राहतील, अशी विनंती न्यायालयाला केली असता न्यायालयाने ही विनंती मान्य केली. 

आता जामीन अर्जावर ७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २५ फेब्रुवारी २०१२ रोजी एरिया मॅनेजर एमआयडीसी नागपूर यांच्याकडून सप्लायमेंट अँग्रीमेंट प्राप्त करून तृप्ती राऊत हिच्या एकटीचे नावे भूखंड नोंदणीकृत केला व अनुराग पिपरे यांची फसवणूक केली. याबाबत ८ नोव्हेंबर २०२२ रोजी अनुराग प्रमोद पिपरे यांनी पोलिस ठाणे गडचिरोली येथे तक्रार दिली असता पोलिसांनी एफआयआर दाखल केला व अरुण मून व तृप्ती राऊत यांच्या विरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos