महत्वाच्या बातम्या

 गणेशोत्सवात एक खिडकी अंतर्गत मिळणार सर्व परवानग्या


- गणेशोत्सव मंडळांना सुलभ, पारदर्शक व वेळेत परवानगी प्रक्रिया

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या मिळविताना नागरिकांना होणारा त्रास व वेळेची नासाडी टाळण्यासाठी जिल्ह्यात ‘एक खिडकी’ यंत्रणा राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयांना स्वतंत्रपणे भेट द्यावी लागत होती. त्यामुळे अर्जदारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या बाबत झालेल्या चर्चेनंतर सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून एकत्रित परवानगीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जामध्ये मंडळाचे नाव, नोंदणी क्रमांक, पदाधिकाऱ्यांची माहिती, गणेशमूर्ती स्थापनेची जागा, विसर्जन मिरवणुकीचा दिनांक, वेळ व मार्ग, स्वयंसेवकांची यादी, आधारकार्डची प्रत तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील.

 गणेशमूर्ती स्थापनेची जागा खाजगी असल्यास जागा मालकाचा नाहरकत दाखला सादर करावा. तसेच आवश्यकतेनुसार धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली असल्यास तिची प्रत अर्जासोबत जोडावी. एक खिडकी यंत्रणेअंतर्गत संबंधित विभागांकडून आवश्यक नाहरकत प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे.

यामध्ये पोलीस विभागाकडून ध्वनीक्षेपक व वाहतूक शाखेचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपरिषद अथवा ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला व स्थानिक स्वराज्य संस्थेकडील शुल्क भरल्याची पावती, विद्युत विभागाकडून तात्पुरत्या विद्युत जोडणीची शुल्क पावती, आवश्यकतेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच अग्निशमन विभागाकडे अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन - 
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम,२००० चे काटेकोरपणे पालन करावे.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिसूचना क्र. अका/दंड/सीआर ३७४ /कावि-८६/२०२६, २१ जानेवारी २०२६ अन्वये गणेशोत्सवासाठी चार दिवस ध्वनीच्या वापराबाबत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. यामध्ये गणेश चतुर्थी अर्थात स्थापना दिवस, गणपती स्थापनेचा दुसरा दिवस, अनंत चतुर्दशी व अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त इतर दिवशी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० चे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी. घरगुती गणेशमूर्ती तसेच ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलाव व खदानांमध्ये करण्यास प्राधान्य द्यावे. निर्माल्य व्यवस्थापनासाठी ‘मंगल कलश’चा जास्तीत जास्त वापर करावा.

गणेशोत्सव साध्या व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करताना कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन, निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण तसेच सामाजिक कार्यांना प्राधान्य द्यावे. गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा.

शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्य आदी उपक्रम आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची आवश्यक परवानगी घेऊन त्या परवानगीचा उल्लेख पावती पुस्तकावर करणे बंधनकारक राहील. गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्व गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.





  Print






Related Photos