राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेसमध्ये झुरळ, अळ्या आणि उंदरांची विष्ठा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मेसच्या भोजनाच्या दर्जावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. जेवणात झुरळ, अळ्या, विविध प्रकारचे कीटक तसेच उंदरांची विष्ठा व अवशेष आढळल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रविवारी, २१ सप्टेंबर रोजी जेवणाचा बहिष्कार टाकत महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले.विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून मेसच्या जेवणासह नाश्त्यामध्ये वारंवार कीटक, झुरळे आणि अळ्या आढळत आहेत. रविवारी भोजनामध्ये उंदरांची विष्ठा व अवशेष आढळल्याचा आरोपही करण्यात आला.
वारंवार तक्रारी करूनही भोजनाच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा न झाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. काही विद्यार्थ्यांनी सुमारे २४ तासांपासून अन्न ग्रहण केले नसल्याचेही सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी मेसचा सध्याचा कंत्राटदार तात्काळ हटवावा, कंत्राट रद्द करून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार भोजन देणाऱ्या नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच वसतिगृहाच्या स्वयंपाकघरासाठी कडक स्वच्छता नियमावली लागू करून दररोज स्वच्छता व जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणीही करण्यात आली. जेवणाच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करून दर आठवड्याला भोजनाची तपासणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनही सतर्क झाले आहे. मेसच्या स्वयंपाकघरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासोबतच वापरले जाणारे तेल, धान्य आणि तयार अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले. तपासणीमध्ये अन्नाची गुणवत्ता किंवा स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान महाविद्यालय प्रशासनाकडून भोजनात कीटक आढळणे ही सामान्य बाब असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आणखी संताप निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
महाविद्यालयातील वसतिगृहात दररोज सुमारे ३०० ते ४०० विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. भोजन तयार करताना कधीतरी कीटक पडला असावा, असे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, संबंधितांना स्वच्छ व दर्जेदार भोजन देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार , मागील वर्षी प्राप्त झालेल्या चार-पाच निविदांपैकी सर्वांत कमी दर समर्थ कॅटर्सचा असल्याने त्यांना मेसचे काम देण्यात आले होते.
मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून, नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू आहे.
जुन्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात आलेले नसून, नवीन कंत्राटदार मिळेपर्यंत त्यांच्याकडून काम सुरू ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित कंत्राटदारावर तातडीने कारवाई करून त्याला निलंबित करण्याची संस्थेची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थी, महाविद्यालय प्रशासन आणि समितीच्या सदस्यांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू होती. मात्र, भोजनाच्या गुणवत्तेबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.




Petrol Price




