महत्वाच्या बातम्या

 खाजगी ट्रॅव्हल्सची मनमानी भाडेवाढ खपवून घेणार नाही : जादा भाडे आकारल्यास तक्रार करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी पाहून खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचे दर मनमानी पद्धतीने वाढविले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग सतर्क झाला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या वाहतूकदारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्यास त्यांनी गप्प न बसता परिवहन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

दिवाळी आणि इतर सणांच्या सुट्ट्यांमध्ये पुणे, नागपूर, अमरावती, हैदराबाद, यवतमाळ, नाशिक आदी शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या गर्दीचा फायदा घेत काही खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करतात. विशेषतः ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांना पर्याय नसल्याने जादा पैसे मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांसाठी कमाल भाडेदर निश्चित केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक १४९/२०११ मधील निर्देशानंतर राज्य शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी केला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच स्वरूपाच्या संपूर्ण बसच्या प्रतिकिलोमीटर भाड्यापेक्षा खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे भाडे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आकारता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करणे नियमबाह्य ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्सच्या भाडे आकारणीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक ट्रॅव्हल्स संचालकांची भेट घेऊन शासनाच्या नियमांची माहिती देत आहेत. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहतूकदारांविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ नुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

प्रवाशांची दिशाभूल होऊ नये आणि तिकिटाचे दर पारदर्शक राहावेत, यासाठी प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कार्यालयात संबंधित मार्गाचा अधिकृत भाडेदर दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. चंद्रपूरमधून विविध शहरांकडे जाणाऱ्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना मार्गनिहाय भाडेदराचा तक्ता कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जादा भाडे आकारले जात असल्यास dyro.34-mh@gov.in आणि dytcinspect.tpt-mh@gov.in या ई-मेल पत्त्यांवर किंवा ७५८८४७३४३४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

खाजगी वाहतूकदारांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रवाशांना वाजवी दरात सेवा द्यावी. तसेच प्रवाशांनीही तिकिटाचे दर तपासून जादा आकारणी होत असल्यास तत्काळ परिवहन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन आरटीओ श्याम लोही यांनी केले आहे.





  Print






Related Photos