नहराच्या पाण्यावरून वाद : लोखंडी सळाखीने डोक्यावर वार

- काटेबाम्हणी येथील घटना; दोघांविरुद्ध तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शेतातील नहराच्या पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी सळाखीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना तुमसर तालुक्यातील काटेबाम्हणी येथे घडली. या घटनेत संबंधित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सलिता संजय मते ३० वर्षे यांचे पती आणि सासरे यांच्यात शेतातील नहराच्या पाण्यावरून वाद सुरू होता. याच कारणावरून राजू यादोराव मते ४५ वर्षे आणि सारजा यादोराव मते ६६ वर्षे यांनी संगनमत करून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वादादरम्यान राजू मते याने लोखंडी सळाखीने सलिता मते यांच्या पतीच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या पतीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सलिता संजय मते यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तुमसर पोलिसांनी राजू यादोराव मते आणि सारजा यादोराव मते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शहारे करीत आहेत. शेतातील नहराच्या पाण्यावरून झालेल्या या वादामुळे परिसरात चर्चा सुरू आहे.




Petrol Price




