महत्वाच्या बातम्या

 एसटीच्या बसफेऱ्या अपुऱ्या : आरमोरीत विद्यार्थी ताटकळले


- शाळा सुटल्यानंतर बसस्थानकावर मोठी गर्दी , अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची विद्यार्थी-पालकांची मागणी -


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आरमोरी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर घरी परतताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसफेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने आरमोरीच्या नवीन बसस्थानकावर विद्यार्थ्यांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. गुरुवारी सायंकाळीही बसस्थानकावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. बस उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास विलंब झाला.

आरमोरी शहरातील महात्मा गांधी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय यांसह विविध शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ठाणेगाव, देऊळगाव, वासरा, पोरला, किटाळी, वैरागड, मानापूर, तेलंगवाडी, भाकरोंडी, पिसेवडधा आदी गावांमधून पाचवी ते दहावीतील विद्यार्थी दररोज आरमोरीत ये-जा करतात. या गावांमधून दररोज पाचशेहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी शहरात येत असल्याने शाळा सुटल्यानंतर आरमोरी बसस्थानकावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते.

बसमध्ये जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ -

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने बसस्थानकावर दाखल होत असले, तरी त्या प्रमाणात बसफेऱ्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बस स्थानकात दाखल होताच त्यामध्ये जागा मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. गर्दीमुळे अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. बसच्या खिडकीतून रुमाल किंवा अन्य वस्तू टाकून जागा पकडण्याचा प्रयत्न काही विद्यार्थी करताना दिसतात. बसमध्ये जागा मिळाली नाही तर पुढील बसची प्रतीक्षा करण्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर पर्याय राहत नाही. त्यामुळे शाळा सुटल्यानंतरही त्यांना बराच वेळ बसस्थानकावर ताटकळत राहावे लागते.

दुपारी ४ ते ५ दरम्यान सर्वाधिक गर्दी -
विशेषतः दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत बसस्थानकावर विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. याच कालावधीत विविध शाळा सुटत असल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या बससेवेवर मोठा ताण येतो. उपलब्ध बसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने काही विद्यार्थ्यांना बस मिळत नाही. परिणामी त्यांना पुढील बसची प्रतीक्षा करावी लागते आणि घरी पोहोचण्यास सायंकाळ उशिरा होतो. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनाही या गर्दीचा सामना करावा लागत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस हीच प्रमुख प्रवासाची सुविधा असल्याने बसफेऱ्या वाढविणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

शाळांच्या वेळेनुसार बसफेऱ्यांचे नियोजन करण्याची मागणी -
आरमोरी शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने शाळांच्या वेळेनुसार बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. विशेषतः शाळा सुटल्यानंतर दुपारी ४ वाजता, ४.१५ वाजता आणि सायंकाळी ५ वाजता अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या समस्येची तातडीने दखल घ्यावी. अतिरिक्त बसफेऱ्या सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची होणारी धावपळ कमी होऊन त्यांना वेळेत व सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos