कुर्ला–बल्लारशाह एक्सप्रेस आता आठवड्यातून दोन दिवस धावणार : आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्याने मंजूर झालेली २०१०७/२०१०८ कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनस)–बल्लारशाह एक्सप्रेस आता आठवड्यातून एकाऐवजी दोन दिवस धावणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना रेल्वे मंडळाने १ जून रोजी जारी केली आहे.
यापूर्वी ही रेल्वे बल्लारशाह येथून शुक्रवारी सुटून शनिवारी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचवत होती. मात्र, शासकीय कामकाज, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच इतर आवश्यक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आठवड्यातून केवळ एकदाच उपलब्ध असलेली ही सेवा अपुरी पडत होती. ही बाब आमदार मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने यासाठी प्रयत्न सुरू केले.
गत ९ मे रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी या रेल्वेची वारंवारता वाढविण्याची मागणी केली. तसेच बल्लारशाहहून सुटणाऱ्या गाडीच्या वेळापत्रकात बदल करून ती आठवड्यातून दोन दिवस चालविण्याची विनंतीही त्यांनी केली होती.
रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वे मंडळाने अखेर या रेल्वेला आठवड्यातून दोन फेऱ्या मंजूर करत अधिसूचना जारी केली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार ही रेल्वे बल्लारशाह येथून सोमवार आणि शुक्रवार, तर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. त्यामुळे बल्लारशाह–वर्धा मार्गे मुंबईसाठी आठवड्यातून दोन दिवस रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. याशिवाय बल्लारशाह–नांदेड मार्गे धावणारी नांदीग्राम एक्सप्रेसची दैनंदिन सेवा आधीपासूनच सुरू आहे.
या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा लाभ होणार असून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सोयीची आणि नियमित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या यशाबद्दल नागरिक, रेल्वे प्रवासी तसेच विविध सामाजिक संघटनांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




