महत्वाच्या बातम्या

 हौशी कलावंतांसाठी चंद्रपुरात तालीम हॉलचे बांधकाम करावे : ज्येष्ठ रंगकर्मी सुशील बुजाडे


- चंद्रपुर येथे राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उदघाटन थाटात संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य नाट्य स्पर्धा हा महाराष्ट्राच्या संपन्न सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदु आहे. या स्पर्धेने अनेक कलावंत घडविले आहे. या स्पर्धेचा ६१ वर्षांचा प्रवास लक्षणीय आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयोजित होणारी ही स्पर्धा विशेष महत्वपूर्ण आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हौशी कलावंतांना स्थानिक पातळीवर अनेक समस्या सहन कराव्या लागतात. प्रामुख्याने तालीम हॉलची समस्या त्यांना दरवर्षी भेडसावते. हौशी कलावंतांसाठी तालीम हॉलचे बांधकाम करण्यात यावे व हौशी संस्थाना दिलासा द्यावा , अशी मागणी ज्येष्ठ नाट्य कलावंत श्री सुशील बुजाडे यांनी केली.

१५ नोव्हेंबर रोजी प्रियदर्शिनी नाट्यगृह चंद्रपुर येथे ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ नाट्य कलावंतसुशील बुजाडे, चंद्रपुर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, सहायक वनसंरक्षक श्रीमती निकिता चवरे, परीक्षक सुहास  भोळे, मुकुंद महाजन, विनोद डावरे यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना प्रकाश लोणकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राची नाट्य परंपरा संपन्न व श्रेष्ठ आहे. ६१ वर्षे हा मोठा कालखंड आहे. या उत्तम व्यासपीठाचा उपयोग कलावंत मंडळीनी योग्य पद्धतीने करत रंगभूमी ला अधिक समृद्ध करावे असेही ते म्हणाले. परीक्षकांच्या वतीने सुहास  भोळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे स्पर्धक संस्थांना शुभेच्छा दिल्या. हौशी कलावंतांच्या न्यायोचित मागण्या प्राधान्याने पूर्ण करू असे मुनगंटीवार म्हणाले. यावेळी रोप, पुस्तक देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. समन्वयक सुशील सहारे यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. ॲड. चैताली बोरकुटे कटलावार, विशाल ढोक, श्रीनिवास मुळावार, राखूंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दिनदर्शिकेशी साधर्म्य राखणारी स्पर्धेतील नाटकांची नावे सांगणारी सुरेख रांगोळी प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेत होती. कोठारी येथील पैज या नाटकाचा प्रयोग सादर झाला. स्पर्धेत चंद्रपुर, यवतमाळ, वणी, गडचिरोली येथील एकूण १२ नाट्य प्रयोग सादर होणार आहे.


पैज :  एक उत्तम नाट्यानुभव

६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ सितारामगिरी बहुउद्देशिय सामाजिक संस्था कोठारी या संस्थेच्या पैज या नाटकाने झाला. ज्येष्ठ लेखिका मन्नू भंडारी यांच्या जिती बाजी की हार या कथेवर आधारित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन पुष्पक भट यांनी केले आहे. एक उत्तम नाट्यानुभव या संस्थेने प्रेक्षकांना दिला.

मुरला या पात्राच्या माध्यमातून माणसाची सामाजिक जवाबदारी लेखकाने मनोवैज्ञानिक पद्धतीने मांडली आहे. आशा, नलिनी, आणि मुरला या कॉलेजच्या मैत्रीणी तिघिंचेही जग इतरांपेक्षा वेगळे आहे. त्या पुरुषांच्या गुलामगिरी पासून दूर राहु इच्छितात. लग्न संस्था त्यांना मान्य नाही, किंबहुना त्यांना त्यापासुन दूर राहायचे आहे. कौटुम्बिक दबावामुळे नलिनीला लग्न बंधनात अड़कावे लागते. मुरला उच्चशिक्षित आहे, ती अविवाहित आहे. आशासोबत ती अविवाहित राहण्याची पैज ती जिंकते. पण शेवटी ती पराभूत आशा कडून आशाच्या आग्रहाखातर अटीनुसार आशाच्या मुलीची मागणी करते व एकप्रकारे जिंकलेली पैज हारते. हे नाटकाचे संक्षिप्त कथानक.

दिग्दर्शकाने नाटक प्रायोगिक पद्धतीने सादर केले. बहुतांश ठिकाणी पात्राच्या कथनाच्या माध्यमातून प्रसंगाना जोड दिली आहे.उपलब्ध अवकाशाचा वापर करून भाव प्रकटीकरण उत्तम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . नेपथ्य सजेस्टिव होते, नाटकाला अनुरूप होते. संगीत देखील उत्तम होते. ट्विंकल मोटघरे , ऋतुजा वानखेड़े, स्नेहा खण्डारे यांनी अनुक्रमे  मुरला, आशा, नलिनी या भूमिका उत्तम अभिनीत केल्या. इतर कलावंतांनी त्यांना उत्तम साथ दिली. नाटकाचे दिग्दर्शन पुष्पक भट यांचे आहे. अक्षय खोब्रागडे यांची प्रकाशयोजना देखील साजेशी होती. नेपथ्य अंकित ठाकरे यांचे असुन संगीत पूजा ठोम्बरे यांचे आहे. सितारामगिरी संस्थेचे पैज हे नाटक पारितोषिकांच्या मालिकेत पैज जिंकते किवा नाही हे निकाला अंती कळेलच .

हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका मन्नू भंडारी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या कथेवर आधारित नाटक सादर झाले हा योगायोग असला तरी सादरकर्त्या संस्थेने त्याच दिवशी त्यांना दिलेली आदरांजली महत्वाची आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos