महत्वाच्या बातम्या

 राज्यपाल कोश्यारींची राजीनाम्याची तयारी : फायनल निर्णय पंतप्रधान घेणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा द्यायची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राजभवनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मनन करण्यात घालवायचा आपला मानस आहे, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवल्याची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. राजभवनने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यापासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत संघर्ष पाहायला मिळाला. मागच्या काही दिवसांमध्ये महापुरुषांबाबत केलेल्या विधानांमुळे कोश्यारी वादात अडकले होते. या विधानांमुळे विरोधकांनी राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनंही केली.





  Print






News - Rajy




Related Photos