महत्वाच्या बातम्या

 चोरांबा, गौरखेडा परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार


- वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : सायखेडा आणि सावंगी पोड परिसरात मागील अनेक वर्षांपासून पट्टेदार वाघाचा वावर आहे. या परिसरात वाघाने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वाघाने चोरांबा आणि गौरखेडा गाव परिसरातही आपला वावर वाढविला आहे. वाघाचे दर्शन होण्यासोबतच त्याने पाळीव जनावरांवर हल्ले केल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गौरखेडा येथील अनिल वाडेकर यांच्या शेळीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. त्यानंतर दिलीप वाडेकर यांच्या श्वानावरही वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात श्वान जखमी झाला. वाघ गावाच्या परिसरात असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आरडाओरड केली. नागरिकांच्या आरडाओरडीमुळे वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.

दरम्यान, चोरांबा येथील महादेव रामगडे यांना शेतशिवारात दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. शेतात कामासाठी गेलेल्या व्यक्तीला दिवसा वाघ दिसल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतीची कामे सुरू असताना वाघाचा अचानक सामना होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सायखेडा, सावंगी पोड या भागात पूर्वीपासूनच वाघाचा वावर असल्याने ग्रामस्थांना वन्यप्राण्यांच्या धोक्याची जाणीव आहे. मात्र, आता चोरांबा व गौरखेडा परिसरातही वाघाच्या हालचाली वाढल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. वाघ गावालगतच्या शेतशिवारात दिवसाढवळ्या फिरताना आढळून येत असल्याने भविष्यात मनुष्यावर हल्ला होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाकडून नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, नुकसानभरपाई मिळणे हा या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय नसून, वाघाचा गाव व शेतशिवारातील वावर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वनविभागाने या परिसरात तातडीने गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसवून त्याचा मागोवा घ्यावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच वाघाचा मानवी वस्तीकडे होणारा वावर रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अनुचित घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करा -
वाघाकडून आतापर्यंत पाळीव जनावरांवर हल्ले झाले असले तरी भविष्यात मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वनविभागाने चोरांबा, गौरखेडा, सायखेडा व सावंगी पोड परिसरातील वाघाच्या हालचालींची गंभीर दखल घेऊन तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





  Print






Related Photos