धनत्रयोदशीआधी सोन्याने घेतली प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ पाहता गुंतवणूकदारांची पसंती सर्वाधिक परतावा देणाऱ्या सोन्याला असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
दसऱ्यापासून सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होत असून, त्यासाठी सोने खरेदी व बुकिंग सुरू झाले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल, अशी अपेक्षा सराफांनी व्यक्त केली. नागपुरात शनिवारी सोन्याचे दर ३२,६०० रुपये असतानाही दुकानांमध्ये गर्दी होती. याशिवाय दोन ते तीन वर्षांपासून आॅनलाईन सोने खरेदीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतरही पारंपरिक सराफाकडे खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे. लग्नसमारंभात वापरण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये पारंपरिक दागिन्यांना नवा साज देण्याचा ट्रेंड आल्याचे सराफांनी सांगितले. या ट्रेंडमध्ये सोन्याच्या दागिन्यांत खडे, हिरे बसवण्याची मागणी होत आहे. एकूण पाहता यावर्षी सोन्याचे दर वधारूनही सराफा बाजारासाठी दिवाळी ‘अच्छे दिन’ घेऊन आल्याचे चित्र आहे.  
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर ठेपली असून बाजारातील लगबगही सुरू झाली आहे. त्यातच नोकरदार वर्गाचे पगार व बोनसही झाल्याने बाजारपेठेत आता खरेदीचा उत्साह जाणवू लागला आहे. आॅनलाईन पोर्टल्सवर शॉपिंग फेस्टिव्हल सुरू असला तरीही प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. यंदा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2018-11-04


Related Photos