महत्वाच्या बातम्या

 पतीसोबत पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले : दुचाकीवरील तिघे पसार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वयाची ६५ वर्षे पार केलेल्या एका वृद्ध महिलेचा पतीसोबतचा साधा प्रवास क्षणात भीतीदायक अनुभव ठरला. रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची गळसरी आणि डोरला अचानक जोरात हिसकावून घेतला. काही कळण्याच्या आतच दागिने घेऊन तिघेही पसार झाले.

मूल तालुक्यातील वैवाळ ते बोंडाळा मार्गावर बलकी देवाच्या समोरील विसावा परिसरात १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे वृद्ध महिला भयभीत झाली असून, याप्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मूखरा देवाजी भोयर (वय ६५), रा. उसेगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर या पती देवाजी नारायण भोयर यांच्यासोबत मुलींना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. वढोली येथून एसटी बसने प्रवास केल्यानंतर त्या सायंकाळी बेंबाळ येथील बसथांब्यावर उतरल्या. तेथून पतीसोबत बोंडाळा गावाच्या दिशेने पायी जात असताना त्यांच्या मागून एका दुचाकीवरून तीन अनोळखी व्यक्ती आल्या.

यातील अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील एका व्यक्तीने त्यांना समोरील गावाबाबत विचारणा केली. वृद्ध महिलेने त्याला बोंडाळा गाव असल्याचे सांगितले. मात्र, क्षणातच या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जोरात हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. दागिने हिसकावून घेतल्यानंतर तिन्ही व्यक्ती दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाल्या.

या घटनेत काळे मणी आणि सोन्याचे सहा मणी असलेली गळसरी तसेच सोन्याचा डोरला चोरीस गेला. आयुष्याच्या उत्तरार्धात असलेल्या या वृद्ध महिलेला रस्त्यात असा अनुभव सहन करावा लागल्याने परिसरात या घटनेची चर्चा होत आहे.

घटनेनंतर मूखरा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या मुलीच्या घरीच थांबल्या. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी पती व नातवासह मूल पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.





  Print






Related Photos