महत्वाच्या बातम्या

 सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याविषयी असलेल्या पुस्तकाच्या स्टोरी टेल आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी  / चंद्रपूर : स्टोरी टेलचे विकासाचा कल्पवृक्ष हे ऑडिओ बुक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यत पोहचवेल. त्यादृष्टीने ही ऑडिओ बुकची संकल्पना निश्चितच महत्त्वाची व उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले. विकासाचा कल्पवृक्ष या पुस्तकाच्या स्टोरी टेलने तयार केलेल्या ऑडिओ बुक आवृत्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. याप्रसंगी वने तथा सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्टोरी टेलचे भारतातील प्रमुख योगेश दशरथ, मराठी विभागाचे प्रमुख प्रसाद मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडे कर्तृत्व असते, त्यांच्याच कार्याबाबत पुस्तक प्रकाशित होतात. मंत्री म्हणून मुनगंटीवार यांचे कार्यकर्तृत्व पाहत आलो आहे. त्यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांची अर्थमंत्री म्हणून काम कऱण्याची पद्धतीही जवळून अनुभवली आहे. वनमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांची विधिमंडळ सभागृहातील भाषणे, विषय मांडण्याची हातोटी सर्वांनाच माहित आहे. ते मांडणी करताना अनेक दाखले, आकडेवारीची पोतडीच घेऊन येतात. मंत्रिमंडळ बैठकीतही ते परखडपणे बोलतात. या ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांची ही तळमळ, त्यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यंत पोहचेल, असा विश्वास आहे.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ऑडिओ बुक हे माध्यम शक्तीशाली आहे. यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आपला महाराष्ट्र धनसंपन्न होईलच. पण तो गुणसंपन्नही होईल. यासाठी या ऑडिओ बुक संकल्पनेचा वापर करता येईल. हे पुस्तक कीरण कुलकर्णी यांनी लिहिले आहे. त्यांच्या ऑडिओ बुक साठी कुणाल आळवे यांनी आवाज दिला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos