कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण : लाखो प्रवाश्यांना मिळणार दिलासा


- उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीचे कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
News - Rajy