महत्वाच्या बातम्या

 अंगणवाड्यांत संपामुळे पोषण आहाराचा बोजवारा : हजारो कुपोषित बालकांच्या प्रकृतीचे काय?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / छत्रपती संभाजीनगर : अंगणवाडी कर्मचारी संपावर असल्यामुळे मागील तेरा दिवसांपासून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, बालकांचे लसीकरण तसेच पोषण आहार वाटपाचा बोजवारा उडाला आहे. दुसरीकडे बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहार वितरित केल्याचा दावा केला जात आहे.

प्रत्यक्षात मात्र किती बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचतो? सुमारे साडेसहा हजार कुपोषित बालकांच्या प्रकृतीवर देखरेख कोणाची? हे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत.

जिल्ह्यात तीन हजारांच्या जवळपास अंगणवाड्या असून, तिथे अडीच हजार अंगणवाडी सेविका, ७७५ मिनी अंगणवाडी सेविका आणि अडीच हजार मदतनीस कार्यरत आहेत. या साऱ्याजणी आपल्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. १६ डिसेंबर रोजी संपाचा १३ वा दिवस आहे. तेव्हापासून अंगणवाड्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.

जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षे या वयोगटातील सुमारे अडीच लाख बालके आहेत. यापैकी ६ हजार ६५० बालके कुपोषित आढळली आहेत. त्यांना संदर्भित आरोग्य सेवा, त्यांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा यासाठी नियमित वजन, उंची व अन्य बाबींच्या नोंदी घेणे, इतर बालकांना नियमित पोषण आहाराचा पुरवठा करणे, त्यांचे लसीकरण, शालेय पूर्व शिक्षण, गर्भवतींची तपासणी, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आदी कार्यक्रम थांबले असून, पोषण ट्रॅकवर त्यांच्या नोंदीची प्रक्रिया ठप्प आहे.

आयुक्तांनी केली चिंता व्यक्त : 
अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्यामुळे बालक, गरोदर माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित असून, ही बाब चिंतेची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वर्षातील ३०० दिवस पोषण आहाराचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात जि. प. महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पर्यायी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नो वर्क नो पेमेंट या तत्त्वानुसार मानधन अदा न करण्याचेही सूचित केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos