४ लाख १० हजारांचे २६ गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

- आरमोरी पोलिसांची कामगिरी
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : पोलीस स्टेशन आरमोरीच्या हद्दीतून गहाळ झालेल्या तब्बल २६ महागड्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात आरमोरी पोलिसांना मोठे यश आले आहे. शोधून काढण्यात आलेले हे सर्व मोबाईल आज, दिनांक २० मे रोजी पोलीस स्टेशन आरमोरी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात संबंधित मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आले. आपले गहाळ झालेले फोन पुन्हा हातात मिळाल्याने सर्व मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. या गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये Apple, Vivo, Realme, POCO, Infinix, Nothing इत्यादी नामांकित कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश होता. या २६ मोबाईल फोनची एकूण अंदाजे किंमत ४ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
हे सर्व मोबाईल शोधण्यासाठी आरमोरी पोलिसांनी केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा अत्यंत प्रभावी व तांत्रिक वापर केला. या पोर्टलच्या माध्यमातून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गडचिरोलीसह शेजारील चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांतून गहाळ झालेले सर्व २६ मोबाईल फोन अत्यंत शिताफीने शोधून काढले व ते हस्तगत केले.
मिळून आलेले हे सर्व मोबाईल आज आरमोरी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे (IPS) यांच्या हस्ते संबंधित मोबाईल धारकांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल प्राप्त करणाऱ्या नागरिकांमध्ये उद्धव रघुनाथ मेश्राम, सुजिता आनंदराव मेश्राम, विनोद आखोजी कांबळे, शेषराव देवचंद बारस्कर, प्रियंका पुण्यभूषण साखरे, भीमराव गणपत डोंगरे, अनंत हरिश्चंद्र मने, विना मारुती पेंदाम, अनिता कालिदास सेलोटे, शुभम उमाकांत देवगेकर, छत्रपती अनुराग वाकुडकर, जयंत मनोहर दहिकर, अजित आनंदराव टेंभुर्णे, अमोल यशवंत धनकर, शुभम वासुदेव उरकुडे, घनश्याम तुळशीराम वनवे, नमिरा शफी कुरेशी, अमन राजू उपरीकर, अरविंद पुष्पराज बोधले, नेहाल भूपाल ठाकरे इत्यादी नागरिकांचा समावेश आहे. आपले गहाळ झालेले महागडे मोबाईल पुन्हा मिळतील अशी आशा सोडून दिलेल्या नागरिकांना जेव्हा फोन परत मिळाले, तेव्हा त्यांनी आरमोरी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
सदर कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक सुरज अनपट व पोलीस शिपाई गुलाब मशाखेत्री यांनी केली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




