राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा एकजुटीने यशस्वी करा : डाॅ. सचिन ओम्बासे


- क्रीडा स्पर्धेसाठी नेमलेल्या विविध समिती सदस्यांना केले मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी असून यासाठी विविध समित्यांमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांनी केले.
आदिवासी विकास विभागाचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन गडचिरोलीत पहिल्यांदाच जिल्हा प्रेक्षागार मैदानावर २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये राज्यातील १ हजार ७५७ खेळाडू सहभागी होणार आहेत. या अनुषंगाने सामाजिक न्याय कार्यालयाच्या सभागृहात संमेलनासाठी गठीत केलेल्या विविध समित्यांमधील सदस्यांची सभा आज २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.
राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जय्यत तयारी सुरू असून क्रीडा आयोजन, व्यवस्थापन, निवास, भोजन, दप्तर, मंच संचालन, प्रसिध्दी, आरोग्य, तक्रार निवारण, प्रमाणपत्र लेखन, साहित्य वाटप आदी समित्यांमधील सदस्यांना सबंधित जबाबदारी नेमूण देण्यात आली आहे.
डाॅ. सचिन ओम्बासे पुढे म्हणाले, जिल्ह्यात पहिल्यांदाच आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा असल्याने सर्वच कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळावी. कुठेही हलगर्जीपणा व कमतरता होता कामा नये. निवास, नाश्ता व भोजन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान खेळाडूंच्या आरोग्याची तसेच भोजनातून व पिण्याच्या पाण्यातून अनुचित प्रकार घडू नये याची नीट काळजी घ्यावी. पिण्यासाठी शुध्द व स्वच्छ पाणी मिळावे याची खबरदारी घ्यावी. नियमाप्रमाणे प्रत्येक बाबीकडे लक्ष ठेवावे. भोजन गृहाच्या आजुबाजूचा परिसर तसेच क्रीडांगण व निवास व्यवस्था स्वच्छ ठेवण्याची दक्षता घ्यावी. मेणुनुसार भोजन तयार करवून घ्यावे. काही चुकीचे होत असल्यास तत्काळ कळवावे. निवास व आवश्यक त्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व्यवस्था करावी, खेळाडूंच्या साहित्याची देखभाल करावी, नियमसंगत खेळ व्हावे, राज्यस्तरीय क्रीडा संमेलनासाठी नेमणूक केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साह व जबाबदारीने काम करावे, अशा सुचना दिल्या.
यावेळी चिमूचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर कार्यालयीन अधीक्षक डी.के. टिंगुसले, विभागीय क्रीडा संमन्वयक संदीप दोनाडकर उपस्थित होते. 
सभेला सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.आर. शिवणकर, आर.के. लाडे, वंदना महल्ले, आदिवासी विकास सहयोगी रामेश्वर निंबोळकर, नितीन इसोकर, नयन कांबळे, सुनिल मिसार, नरेंद्र कावळे, विजय टेंभुर्णीकर, के.डी. मेश्राम, पी.जी. जामठे, सुधीर शेंडे, सुधाकर गौरकर, केशव गजभिये, जे.पी. शेंडे, एस.के. बन्सोड, व्ही. आय. भिवगडे, आर.टी. धोटकर, अनिल सोमनकर यांच्यासह नागपूर विभागातील सबंधित कर्मचारी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-22


Related Photos