राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा अन्यथा आंदोलन करू : काँग्रेस कमिटी कोरचीचा ईशारा
विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : महाराष्ट्र हे शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर व प्रगत राष्ट्र म्हणून देशात ओळखले जाते. राज्यात सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील विविध नामवंत शिक्षण संस्था च्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शिक्षण हा पुढील शिक्षणाचा पाया आहे असे असताना महाराष्ट्र सरकार राज्यातील 14000 शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही करत असल्याचे दिसून येत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. या शाळांमधून गरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. खाजगी शाळांमधील शुल्क त्या सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही आणि दुर्गम भागात, गावखेड्यात अशा शाळा ही उपलब्ध नाही. त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
संसदेत 2009 मध्ये शिक्षणाचा अधिकार कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्याने 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक बालकास जवळच्या शाळेत प्रवेश सोबत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. या वयोगटातील बालकांना शिक्षण मिळण्याची खात्री करण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे शून्य ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा जो घाट राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे तो शिक्षण हक्क कायद्याला हरताळ फासणारा आहे. यामुळे आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे. शाळा बंद केल्या तर या भागातील मुलांनी शिक्षणासाठी कुठे जायचे गावापासून दूर अंतरावरील शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेणे लहान मुलांना किती अडचणीचे ठरू शकते याचा विचार शिक्षण विभागाने घेतला का?शाळा बंद करण्याचा जो घाट घातला जात आहे त्याला सर्व स्तरावरून विरोध होत आहे. सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या या निर्णयात काँग्रेस पक्षाचा ही विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनतेच्या मुलांना शाळेपासून वंचित ठेवून भावी पिढीचे भविष्य अंधारात ढकलण्याचे काम आपण करू नये ही कार्यवाही तात्काळ थांबवण्याचे आदेश देऊन ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला न्याय द्यावा अन्यथा कोरची तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार तहसील कार्यालय कोरची यांच्या माध्यमातून निवेदनातून देण्यात आलेला आहे. यावेळी निवेदन देताना कोरची तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिवासी गोंड समाज तालुका अध्यक्ष रामसुराम काटेंगे, बुधराम फुलकुवर सरपंच ग्रामपंचायत सातपुती, विठ्ठलराव शेंडे गुटेकसा, रुखमन घाटघूमर, धर्मराज नैताम नगरसेवक, धनराज मडावी नगरसेवक, मेहरसिंग काटेंगे, वसीम शेख सोशल मिडिया सेल काँग्रेस तालुका कोरची, परमेश्वर लोहंबरे उपसरपंच ग्रामपंचायत नांगपूर, श्रावण मातलाम माजी सभापती कोरची, इंदल कुमरे सरपंच नांगपूर, जीवन नरोटे उपसरपंच बो, धरमसिंग कल्लो सातपुती आदी उपस्थित होते.
News - Gadchiroli