महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला एमएसएमई क्षेत्राची ताकद मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- चाकण-भोसरीच्या औद्योगिक भरारीला नवी झेप; ४९ एमएसएमईंसोबत सामंजस्य करारातून २,३२०.९७ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणखी गती देण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई क्षेत्राला बळ देण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्यातील ४९ एमएसएमई उद्योगांसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून २ हजार ३२०.९७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादनक्षमता वाढण्यासोबतच हजारो रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील आणि पुणे परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराचा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योग (गुंतवणूक व सेवा विभाग) आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, एमएसएमई आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, विशेष आयुक्त (मैत्री) वैभव वाघमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोठ्या उद्योगांच्या विस्तारामागे एमएसएमईंचा मजबूत आधार -
महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून, देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. मोठ्या उद्योगांना आवश्यक घटक, सुटे भाग, सेवा आणि विविध उत्पादनांचा पुरवठा करण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीत एमएसएमई क्षेत्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांच्या विस्तारामागे एमएसएमई क्षेत्र मजबूत आधारस्तंभ म्हणून उभे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे आणि परिसरातील ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी उद्योगांच्या परिसंस्थेत एमएसएमई उद्योगांची भूमिका विशेष महत्त्वाची आहे. अनेक मोठे उद्योग त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक घटक आणि सेवा स्थानिक एमएसएमईंकडून घेतात. यामुळे स्थानिक उद्योगांना बाजारपेठ मिळण्यासोबतच रोजगाराच्या संधीही निर्माण होतात.
लोकल टू ग्लोबलला चालना -
एमएसएमई क्षेत्र अनेक उत्पादनांच्या आयातीला पर्याय निर्माण करण्याचे काम करत आहे. स्थानिक उत्पादनक्षमता वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत होत असून, लोकल टू ग्लोबल वाटचालीलाही चालना मिळत आहे.
चाकण-भोसरीतील ४९ एमएसएमई उद्योगांसोबत झालेले सामंजस्य करार महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
एमएसएमई सेन्ससमुळे धोरणनिर्मितीला मदत -
एमएसएमई क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि वेगवान विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे. राज्यातील एमएसएमई उद्योगांची संख्या, त्यांचे स्वरूप, रोजगारनिर्मिती, उत्पादनक्षमता आणि विविध गरजा यांचा अचूक आढावा घेण्यासाठी एमएसएमई सेन्सस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन अधिक परिणामकारक धोरणे आणि सुविधा निर्माण करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
करारापासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा वेग -
४९ एमएसएमई उद्योगांना आवश्यक जमीन, पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग व एमआयडीसीकडून वेगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधित उद्योगांनी एक ते दोन वर्षांत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
त्यामुळे प्रस्तावित गुंतवणुकीचा परिणाम केवळ सामंजस्य करारापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष उत्पादन, रोजगारनिर्मिती, स्थानिक व्यवसायाच्या संधी आणि पुरवठा साखळीच्या विस्ताराच्या रूपात दिसण्याची अपेक्षा आहे.
जुन्या औद्योगिक वसाहतींचे होणार आधुनिकीकरण -
महाराष्ट्राने परकीय थेट गुंतवणूक, उद्योग, उत्पादन, स्टार्टअप्स आणि विविध औद्योगिक क्षेत्रांत देशातील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. हे स्थान टिकविण्यासाठी उद्योजकांना सक्षम पायाभूत सुविधा आणि उद्योगस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील अनेक औद्योगिक वसाहती ३० ते ४० वर्षांपूर्वी विकसित झाल्या आहेत. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार त्यांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी या वसाहतींना औद्योगिक नगरीचा दर्जा देऊन स्वतंत्र प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
स्थानिक करातून प्रशासन, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याची संकल्पना यामागे आहे. या उपक्रमाची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात इतर औद्योगिक वसाहतींचेही आधुनिक औद्योगिक नगरीमध्ये रूपांतर करण्याचा शासनाचा मानस आहे.
चाकणमध्ये गुंतवणुकीची मोठी क्षमता -
चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीचा उल्लेख करताना उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांनी मागितलेली जमीन वर्षभरातच अपुरी पडेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक या भागात अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत असून, राज्य शासन उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजकांचा महाराष्ट्रावर पूर्ण विश्वास -
चाकण-भोसरी परिसरातील उद्योजक राज्याबाहेर स्थलांतरित होत असल्याच्या चर्चांना डॉ. सामंत यांनी फेटाळून लावले. महाराष्ट्रातील एकही उद्योजक राज्याबाहेर गेलेला नसून, उद्योजकांचा महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरणावर आणि राज्य शासनावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाकण-भोसरी परिसरातील प्रस्तावित गुंतवणूक आणि एमएसएमईंच्या विस्तारामुळे पुणे परिसरातील ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी उद्योगांची पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. २,३२०.९७ कोटींची प्रस्तावित गुंतवणूक प्रत्यक्षात उतरल्यास उत्पादनवाढीसोबत रोजगार, स्थानिक व्यवसाय आणि औद्योगिक विस्ताराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.




Petrol Price




