महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह अद्ययावत सुविधांची निर्मिती करावी : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे


- चला शाळेत जाऊया अभियानाचा आढावा

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / नागपूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यावर भर द्यावा. राज्य शासनासाठी शिक्षण क्षेत्र प्राधान्यक्रमावर असून शाळांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यादृष्टीने शिक्षकांची जबाबदारी वाढली असून विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व अद्ययावत सुविधांची निर्मिती करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे  यांनी आज येथे दिले.

चला शाळेत जाऊया अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आज नागपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत मंत्री भुसे  बोलत होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलच्या सभागृहात आयोजित बैठकीस महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हाथीबेड, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल दहिफळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)निलेश गुंड, महापालिका शिक्षणाधिकारी अमित भदाणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे , सेंट उर्सुला हायस्कूलच्या संचालक रचना सिंग,  सेंट उर्सुला हायस्कूलच्या मुख्याध्यापक श्रीमती शितल पीटर,अधीक्षक विशाल गौर यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

योजनांच्या बैठका व आढावा याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये व शाळांच्या भौतिक विकासात दिसले पाहिजे असे सांगून श्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विजेची सोय, आवश्यक फर्निचर आणि आधुनिक ई-सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, शाळा परिसराची स्वच्छता, क्रीडांगणे विकसित करणे आणि कुंपण भिंत उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. शिक्षकांच्या भरतीमुळे हा विभाग अधिक परिपूर्ण होत असून जिल्हा व तालुकास्तरावरील शाळांनी त्यांची संकलित माहिती योग्य पद्धतीने पोर्टलवर भरण्याचे आदेश त्यांनी दिले.

शाळांचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत चला शाळेत जाऊया हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानात पालकमंत्री, लोकप्रतिनिधी,वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देत आहेत. त्यात आपण स्थानिकांचा सहभागही मिळवावा. त्यातून आपल्या शाळांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. या भेटींमुळे अधिकाऱ्यांना शाळांच्या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणे सुलभ होणार असून शिक्षणविषयक समस्यांवर उपाययोजना करता येणे शक्य होईल.

शाळांनी केलेल्या सादरीकरणातून श्री भुसे यांनी शाळांची शैक्षणिक पद्धत, शिक्षकांचे नावीन्यपूर्ण उपक्रम, त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती यावेळी घेतली. शाळांमध्ये शैक्षणिक वातावरणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कला-क्रीडा स्पर्धा, सहली, पालक मेळावे, स्नेहसंमेलने आणि माजी विद्यार्थी संघांच्या मेळाव्यांचेही आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

आयडॉल बँके तील अनुभवाचा उपयोग -
मागील वर्षापासून उत्कृष्ट काम करणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि चांगल्या कामगिरी करणाऱ्या शाळांची आयडॉल बँक तयार करण्यात आली आहे. या शिक्षकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतर शाळांमध्येही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केला जात असून  एखाद्या शिक्षकाने किंवा शाळेने केलेला यशस्वी प्रयोग व्यापक स्तरावर इतर शाळांमध्ये कसा राबविता येईल, याचे नियोजन करण्यात यावे असे दादाजी भुसे यांनी सांगितले.

आयडॉल शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व सीएसआर फंड  ( सामाजिक उत्तरदायित्व निधी) देण्याऱ्या संस्था प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. शिक्षकांनी, सामाजिक संस्थांनी  अनुभव कथन केले.





  Print






Related Photos