किष्ठापूरच्या शाळेची दुरवस्था : विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ


- इमारत अपुरी, शिक्षकांचा अभाव, डेस्क-बेंच नाहीत; शाळेला संरक्षक भिंतही नाही - CJPच्या School Visit मध्ये धक्कादायक परिस्थिती समोर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : किष्ठापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे CJP गडचिरोलीच्या School Visitमध्ये समोर आले आहे. शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी पुरेशी व सुसज्ज नसल्याने इमारतीअभावी विद्यार्थ्यांना मंदिरात बसवून शिकवावे लागत असल्याची परिस्थिती पाहणीदरम्यान निदर्शनास आली.
CJPच्या शाळा सुधारणा मोहिमेअंतर्गत किष्ठापूर येथील शाळेला भेट देऊन शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी शाळेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, स्वच्छता आणि शैक्षणिक सुविधा यांचा आढावा घेण्यात आला.
शाळेला संरक्षक भिंत नाही साप निघाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे -
शाळेला संरक्षक भिंत (Wall Compound) नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात यापूर्वी साप निघाल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहणीदरम्यान सांगण्यात आले.
मुला-मुलींना एकच शौचालय -
शाळेत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. मुला-मुलींना एकच शौचालय वापरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
खचलेला फ्लोअर, डेस्क-बेंचचाही अभाव -
विद्यार्थी खाली बसतात त्या ठिकाणी फ्लोअर दबलेला/खचलेला असल्याचे दिसून आले. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक डेस्क-बेंच उपलब्ध नसल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची परिस्थिती आहे.
लॅब नाही, क्रीडा साहित्य नाही शिक्षकांचीही कमतरता -
शाळेत प्रयोगशाळा (Lab) उपलब्ध नाही, तसेच आवश्यक क्रीडा साहित्याचा अभाव असल्याचे समोर आले. त्याचबरोबर शाळेत आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसल्याची बाबही पाहणीदरम्यान निदर्शनास आली.
किचनमध्ये पाणी साचते; अन्नधान्य खराब होण्याची समस्या -
शाळेच्या किचनची स्थितीही समाधानकारक नसल्याचे पाहणीदरम्यान आढळले. किचनमध्ये पाणी साचत असल्यामुळे अन्नधान्य खराब होण्याची समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण व स्वच्छतेच्या दृष्टीने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
BDO यांना निवेदन; तातडीने सुविधा देण्याची मागणी -
शाळेतील या विविध समस्यांची दखल घेऊन CJP गडचिरोलीच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती चामोर्शी यांना निवेदन देण्यात आले. शाळेची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
सुसज्ज शाळा इमारत, आवश्यक शिक्षक, संरक्षक भिंत, स्वतंत्र शौचालये, डेस्क-बेंच, प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, खचलेल्या फ्लोअरची दुरुस्ती तसेच किचनची योग्य व्यवस्था आणि पाण्याचा निचरा या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी CJPकडून करण्यात आली. CJP टीम मेंबर सुरज पिपरे, जावेद खान,कल्पक चंद्रगिरे, पियुष ताटलावार, सक्षम रामटेके, आणि वेदांत काटे, दिलावर साखरे, यश गलगट यांनी School Visit करून शाळेतील परिस्थितीची पाहणी केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ येत असेल तर प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी भूमिका CJP टीमच्या वतीने व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




