प्रसुतीनंतर महिलेच्या पोटात ठेवले बॅन्डेज आणि कापसाचे गोळे, महिला व बाल रूग्णालयातील प्रकार


- सबंधितावर कारवाई करण्याची नारी आदिवासी संघटनेची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या महिला व बाल रूग्णालयात रोजच नवनवीन घडामोडी घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला असून महिलेच्या प्रसुतीनंतर बॅन्डेज पट्टी आणि कापसाचे बोळे महिलेच्या पोटातच ठेवण्यात आल्याचा आरोप नारी आदिवासी संघटना गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या  निष्काळजीपणामुळे महिलेची प्रकृती धोक्यात आली असून सबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
पत्रकार परिषदेला रूग्ण कांती शर्मा, रूग्णाची आई लालनी नैताम, नारी  आदिवासी संघटनेच्या सुलोचना मडावी, भारती मडावी, लक्ष्मी कन्नाके, जयश्री येरमे, रेखा तोडासे, नेहा गेडाम, कविता मेश्राम, रोहिणी मसराम, ममता करपाते, रूग्ण महिलेचा पती शिवकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
रूग्ण कांती शर्मा हिने दिलेल्या माहितीनुसार तिला प्रसुती कळा सुरू झाल्यानंतर १० आॅक्टोबर रोजी महिला व बाल रूग्णालयात सकाळी ८ वाजता दाखल करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तपासणी करून थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले. आकस्मिक रूग्ण असतानासुध्दा  तिच्यावर १२ तासापर्यंत उपचार करण्यात आला नाही. यानंतर सायंकाळी ६ वाजता आशा वर्कर ने रूग्णास प्रसुतीगृहात नेले. प्रसुती ७ वाजून ५० मिनिटांनी करण्यात आली. मात्र ९ वाजता टाका मारण्यात आला. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव होत होता. याबाबत परिचारीकेला सांगितले असता त्यांनी रूग्णाच्या आईला धक्का देवून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच असभ्य वर्तणूक केली. टाका मारण्यात आल्यानंतर रूग्णाच्या पोटामध्येच बॅन्डेज आणि कापसाचे बोळे ठेवण्यात आले. यानंतर १२ आॅक्टोबर रोजी रूग्णालस सुट्टी देण्यात आली. काही दिवसानंतर रूग्णास त्रास होउ लागला. यामुळे कनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका सुनंदा सुपारे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तपासणी केली असता कापसाचे बोळे आणि बॅन्डेज पोटात असल्याचे आढळून आले. परिचारिका सुपारे यांनी सदर कापसाचे बोळे काढून टाकले. परंतु १७ दिवस पोटामध्ये कापूस आणि बॅन्डेज पट्टी राहिल्यामुळे महिलेची प्रकृती अत्यंत खालावली. तिचा जीव धोक्यात आला. या प्रकाराला केवळ रूग्णालयातील कर्मचारीच जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रूग्ण व नारी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. दीपचंद सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सबंधित महिलेची प्रसुती साधारण होती. यामुळे कापसाचे बोळे आणि बॅन्डेज पट्टी पोटात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रसुतीदरम्यान कोणतीही हयगय केलेली नाही. प्रसुतीनंतर त्रास झाल्यावर रूग्णाने आधी रूग्णालयात दाखल होणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. याबाबत आपण जिल्हा शल्य चिकीत्सकांना माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक समिती गठीत केलेली आहे. यामुळे लवकरच चौकशीअंती प्रकरण समोर येईल, असे डाॅ. सोयाम यांनी म्हटले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-30


Related Photos