महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना विद्यापीठात राज्य मागासवर्ग आयोगाची आढावा बैठक संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्य मागासवर्ग आयोगाने गोंडवाना विद्यापीठाला आज भेट देऊन विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदभरतीचा आढावा घेतला. विद्यापीठ सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदस्य महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग माजी न्यायमुर्ती चंद्रलाल मेश्राम, प्रा.डॉ. नीलिमा सरप, प्रा. डॉ. गोविंद काळे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अधिष्ठाता मानव विज्ञान शाखा डॉ. चंद्रमौली, नवसंशोधन केन्द्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार, सहाय्यक आयुक्त मुंबई मेघराज भाटे, नागपूर विभाग सहसंचालक, उच्च शिक्षण, डॉ. संजय ठाकरे, समाज कल्याण आयुक्त, गडचिरोली, अमोल यावलीकर, सहाय्यक आयुक्त मनोहर पोटे आदी उपस्थित होते.

शासनाने २०८८ शिक्षकांची पदे महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालयांना मंजूर केली आहेत. ही पदे तातडीने भरली जावीत यासाठी आयोगाकडून आढावा घेतला जात आहे. शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी तसेच त्याचा लाभ सर्व संवर्गाला व्हावा, असे मत समितीतील सदस्यांनी बैठकीत व्यक्त केले. संवर्गनिहाय आरक्षण धोरणाचा पाठपुरावा होणे हा बैठकीचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील पदभरतीचा अनुशेष भरण्यात यावा, नॅकच्या दृष्टिकोनातून संस्थांचे मूल्यांकन वाढावे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी हा आढावा महत्त्वपूर्ण असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी तातडीने सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे भरली नाहीत तर इतर महाविद्यालयाना ही पदे मंजूर करण्यात येईल. असेही सांगितले. विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, ज्या महाविद्यालयांमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी कक्ष नाही अशा महाविद्यालयांमध्ये तो स्थापन करण्यात यावा. असे निर्देश समिती सदस्यांनी दिले.

यावेळी विद्यापीठात सुरू असलेल्या अनेक उपक्रमाबाबत संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार यांनी पीपीटी द्वारे सादरीकरण केले. गेल्या अकरा वर्षात विद्यापीठाची सुरू असलेली यशस्वी घोडदौड पाहता ती इतर विद्यापीठांच्या तुलनेत अतिशय चांगली असल्याचे समितीतील सदस्यांनी मत व्यक्त केले. तसेच नव संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार यांचा समितीतील सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्यासाठी सत्कार केला. या बैठकीत आभार कुलसचिव डॉ. अनिल हीरेखन यांनी मानले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos