महत्वाच्या बातम्या

 सर्पदंशाने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत द्या


- मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी; उपचाराधीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत देण्याची मागणी

- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष द्या; असंख्य शाळांमध्ये पिण्याचे पाणी व बाथरूमची सुविधा नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपलताई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या सहा विद्यार्थ्यांना सर्पदंश झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थिनींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या गंभीर घटनेची शासनाने तातडीने दखल घेऊन कठोर पावले उचलावीत. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये, तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी तीव्र व एकमुखी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष नको -
प्रसिद्धीपत्रकात सुरेंद्र अलोणे यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक शाळांमध्ये साध्या पिण्याच्या पाण्याची तसेच बाथरूम व स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था नाही. शासन आणि संबंधित प्रशासनाकडून या प्रश्नांकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना उत्तमोत्तम, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने विशेष लक्ष घालून शाळा व आश्रमशाळांमधील सुविधांचा आढावा घ्यावा, अशी मागणी अलोणे यांनी केली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या -
आश्रमशाळांच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर निवासाची व्यवस्था असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांची तातडीने पाहणी करून इमारतींची सुरक्षितता, परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच साप व इतर विषारी प्राण्यांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाहीत, याची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जागतिक आदिवासी दिनीच दुर्दैवी घटना -
९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगभरात आणि विशेषतः देशात गौरवपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जात असतानाच आदिवासी समाजातील कोवळ्या विद्यार्थिनींवर काळाने घाला घातला. सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू होणे ही अत्यंत चिंताजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असताना त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे. जपलताई आश्रमशाळेतील ही घटना शासन आणि संबंधित शिक्षण संस्थांना धडा शिकविणारी असल्याची संतप्त व नाराजीची प्रतिक्रिया सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली आहे.

जपलताई घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचला -
धानोरा तालुक्यातील जपलताई आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडलेल्या या दुर्घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत. जिल्ह्यातील सर्व शाळा व आश्रमशाळांच्या वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात.

विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेऊ नये. संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करून त्रुटी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत आणि कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी देऊन शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी सुरेंद्र अलोणे यांनी केली आहे.

सर्पदंशाच्या घटनेतील विद्यार्थी -
मृत्यू झालेल्या विद्यार्थिनी - सुश्मिता सरोजित मंडल - १४ वर्षे, दीपिका एतवा लकडा - १२ वर्षे, अनु गजुराम कोरटी - ८ वर्षे

उपचाराधीन विद्यार्थिनी -
दीपिका बिटलूरसाय मडावी - ११ वर्षे, समृद्धी सुरेश नैताम - १४ वर्षे, कविता राजकुमार किरंगा - १२ वर्षे





  Print






News - Gadchiroli




Related Photos