महत्वाच्या बातम्या

 पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप शेतकऱ्यांसाठी संधी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- विकास भवन येथे फार्मर कप नियोजन कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पाणी फाऊंडेशनच्यावतीने फार्मर कप ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. ही स्पर्धा शेतकऱ्यांसाठी संधी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

विकास भवन येथे फार्मर कप २०२४ अंतर्गत नियोजन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांच्यासह मुख्य मार्गदर्शक म्हणून पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ सोबतच उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, तहसीलदार रमेश कोळपे, विस्तार अधिकारी देवतळे, डॉ.सचिन पावडे, मिशन समृद्धीचे किशोर जगताप, पानी फाऊंडेशन विभागीय समन्वयक भूषण कडू उपस्थित होते.

फार्मर कप २०२४ साठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना सहभागी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी फाउंडेशनचे आभार मानले. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक गटातून पाच शेतकऱ्यांनी सहभागी होऊन ही गटशेतीची चळवळ जिल्ह्यामध्ये मोठी करण्याचा प्रयत्न करु. जिल्हा प्रशासन पाणी फाऊंडेशन व शेतकऱ्यांना यासाठी आवश्यक सहकार्य करेल, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले.

डॉ.अविनाश पोळ यांनी फार्मर कप व गटशेतीचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचे असल्यास एकत्र येऊन गटांच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे. यावेळी खरांगणा येथील स्वावलंबी शेतकरी गट व संत काळे महाराज शेतकरी गटाने आपले अनुभव कथन केले. या गटाने आपल्या दोन वर्षाचा गटाचा प्रवास सांगितला. सर्वांनी एकत्र येऊन समस्यांचा सामना कसा केला पाहिजे हे सांगितले.

उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार यांनी वॉटर कप मध्ये काम करण्याचे त्यांचे अनुभव सांगितले. गटशेतीची चळवळ मोठी करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी होण्याचे आवाहन केले. भूषण कडू यांनी प्रास्ताविकाद्वारे पानी फाउंडेशनचा प्रवास विषद केला. पाणी फाऊंडेशन फार्मर कपच्या माध्यमातून गटशेतीची चळवळ तयार करत आहे.

या कपसाठी राज्यात केवळ वर्धा संपूर्ण जिल्हा घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला वर्धा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, उमेदच्या समूह संसाधन व्यक्ती, कृषी सखी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन राम अंभुरे यांनी केले तर आभार निखिल अंबुलकर व मीनाक्षी कुबडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी नागपुरे, गणेश तुळसकर यांनी सहकार्य केले.





  Print






News - Wardha




Related Photos