आज बोरी येथे बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळा : पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची असणार उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, मुल्यवर्धन आणि विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २२ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर राहणार आहे. यावेळी वित्त, नियोजन, कृषि, मृद व जलसंधारण राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, खासदार अनिल बोंडे, खासदार अमर काळे, सर्वश्री आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ.नवनीता काकडे, संजय भेंडे, अरुण लखानी, समीर कुणावार, राजेश बकाने, सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट व प्रगतीशील शेतकऱ्यांना बळीराजा सन्मान प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे. तसेच कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोनद्वारे शेती, सूक्ष्म सिंचन, कापूस उत्पादनातील सुधारीत तंत्रज्ञान, कृषि मुल्यवर्धन, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य तसेच विविध अनुदान योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुपारी ३.३० वाजता आयोजित या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषि उद्योग, युवक व महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरिकर यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




