सेमाना परिसरात एसटी बसला दुचाकीची धडक : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


- विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराचा अपघात; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरालगतच्या सेमाना परिसरात एसटी बसला विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मृत तरुणाचे नाव सुमित रमेश ढोमणे २७ वर्षे, रा. फुले वॉर्ड क्रमांक २, गडचिरोली असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची एसटी बस मालेरच्या दिशेने जात होती. सेमाना परिसरातील वळणावर बस येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या सुमित ढोमणे यांच्या दुचाकीची बसला धडक झाली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील सुमित ढोमणे यांना तातडीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत -
या अपघातामुळे सेमाना परिसरातील महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त बस आणि दुचाकी रस्त्यावर असल्याने वाहनांची ये-जा प्रभावित झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने पोलिस कुमक घटनास्थळी पाठविली. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि एसटी बस रस्त्याच्या बाजूला हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आकस्मिक मृत्यूची नोंद -
या प्रकरणी एसटी बसचालक टीकचंद आभारे यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताच्या कारणांचा तसेच घटनेच्या संपूर्ण परिस्थितीचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
सेमाना परिसरातील वळणावर झालेल्या या अपघातामुळे वाहनचालकांनी वळणाच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




