महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : हरवलेले व चोरीला गेलेले ११ मोबाईल शोधून नागरिकांना केले परत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळाले आहे. कुरखेडा पोलिसांनी तांत्रिक कौशल्य, आधुनिक प्रणाली आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून तब्बल ११ मोबाईल फोन शोधून काढले असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत २ लाख रुपये इतकी आहे.

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, प्रवासादरम्यान किंवा अन्य कारणांमुळे मोबाईल हरविणे अथवा चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. अशा मोबाईलचा गैरवापर करून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल तातडीने शोधणे आवश्यक असते.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांनी सायबर गुन्हे आणि मोबाईल चोरीच्या घटनांबाबत सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांना सतर्क राहून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार पोलीस स्टेशन कुरखेडा येथे दाखल झालेल्या हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रारींचा तपास सुरू करण्यात आला. कुरखेडा पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, आधुनिक प्रणालीचा वापर आणि सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून ११ मोबाईल फोन शोधून काढले.

नागरिकांनी मोबाईल हरवल्यानंतर त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने तसेच पोलिसांनी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केल्याने हे मोबाईल शोधण्यात यश आले. शोधण्यात आलेले मोबाईल फोन १० जुलै २०२६ रोजी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे संबंधित नागरिकांना बोलावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी गडचिरोली पोलीस प्रशासनाचे आभार मानले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.

मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन -
सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून सायबर गुन्हेगार विविध प्रकारची आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात, उपपोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाने केले आहे.

मोबाईल चोरी झाल्यास संबंधित ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी मोबाईलचा सुरक्षित वापर करावा तसेच अनोळखी लिंक, संदेश किंवा आमिषांना बळी पडू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात कुरखेडा पोलीस पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

या कारवाईत मसपोनि. प्रियंका राजकुमार आघाव तसेच पोलीस अंमलदार पंकज नवघरे यांनी विशेष योगदान दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos