महत्वाच्या बातम्या

 जीव गेला तरी जमीन देणार नाही : जयरामपूर–येनापूर परिसरात १० किमी शेतकरी पदयात्रा, - एमआयडीसी विरोधात हजारोंचा एल्गार


- महिला शेतकऱ्यांची लक्षनीय उपस्थिती 
- पदयात्रा अत्यन्त शिस्तीत
- प्रशासणाचेही सहकार्य 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : सरकारकडून गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनविण्याच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसीला सुपीक शेतजमीन देण्याला विरोध अधिक तीव्र होत असून, जयरामपूर–येनापूर परिसरातील १३ बाधित गावांतील हजारो शेतकऱ्यांनी आज मंगळवार ४ ऑगस्ट रोजी शांततामय पदयात्रा काढून शासनाला ठाम इशारा दिला. जीव गेला तरी जमीन देणार नाही, एमआयडीसी नको, शेती हवी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

सकाळी ११ वाजता लक्ष्मणपूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. दुर्गापूर, किष्टापूर आणि चित्तरंजनपूर मार्गे सुमारे १० किलोमीटरचे अंतर पायी पार करत दुपारी दीडच्या सुमारास शेतकरी येनापूर येथील मंडळ कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर आयोजित सभेत चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे आणि मंडळ अधिकारी अतकारे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात, कोणत्याही परिस्थितीत शेतीची जमीन देणार नाही, कितीही मोबदला दिला तरी जमीन संपादित होऊ देणार नाही, शासनाने बळजबरी करू नये, तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे १३ गावांतील शेतकऱ्यांनी शंभर टक्के शेतीची कामे बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. महिला शेतकऱ्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. युवा स्वयंसेवकांनी संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळत शिस्तबद्ध व्यवस्थापन केले. पदयात्रेदरम्यान वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच वाहनांना मार्ग करून दिला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही आंदोलन पूर्णपणे शांततामय वातावरणात पार पडले. जवळपास ४ ते ५ हजार शेतकरी सहभागी झाले होते.

सुमारे १० किलोमीटरचा पायी प्रवास करूनही शेतकऱ्यांचा उत्साह कायम होता. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात एमआयडीसी नको, शेती हवी, शेती वाचवा, भविष्य वाचवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेतली नाही, तर भविष्यात यापेक्षाही व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही शतकऱ्यांनी यावेळी दिला.

 व्यापाऱ्यांनी १०० टक्के बंद पाळून शेतकऱ्यांना दिला पाठिंबा -

जयरामपूर–येनापूर परिसरातील प्रस्तावित एमआयडीसीमुळे भविष्यात विस्थापनाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनीही शेतकरी आंदोलनाला भक्कम साथ दिली. शेतकरी पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर ४ ऑगस्ट रोजी येनापूर–चित्तरंजनपूर येथील संपूर्ण व्यापारपेठ शंभर टक्के बंद ठेवण्यात आली. व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या लढ्याशी एकजूट दर्शविली. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि परिसराचे अस्तित्व टिकविण्यासाठी हा लढा असल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांच्या या अभूतपूर्व सहभागामुळे शेतकरी आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos