एलसीबी पोलिसांच्या पाठलागानंतर गोवंश तस्करीचा ट्रक जेरबंद : दोघांना अटक, दोघे फरार; २२.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार ४ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करत अवैधरीत्या गोवंशांची वाहतूक करणारा १० चक्का टाटा ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत ३५ गोवंशांची सुटका करण्यात आली असून ट्रक, गोवंश व मोबाईल हँडसेट असा एकूण २२ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चालक व क्लिनरसह दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन पडोली हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी एमएच ३१ सीव्ही ०८१७ क्रमांकाचा १० चक्का टाटा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता भद्रावतीच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने तात्काळ पाठलाग करून जुना सुमठाणा येथील सब स्टेशन पावर ग्रिड परिसरात ट्रक ताब्यात घेतला.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ३१ गायी व ४ बैल असे एकूण ३५ गोवंश अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ गोवंशांची सुटका करून ट्रक जप्त केला.
या प्रकरणात भुषण ओमकार तरारे (२४), रा. आझादनगर, कामठी, नागपूर आणि सयद जसिन सयद असलम (३३), रा. ताजबाग चौक, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर राकेशकुमार यावकराम टेकाम व मोसिन हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
कारवाईदरम्यान १५ लाख किमतीचा १० चक्का टाटा ट्रक, ७ लाख किमतीचे ३५ गोवंश आणि ३५ हजार किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण २२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर, पोहवा सतीश अवथरे, इमरान खान, लालू यादव, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, शशांक बादामवार यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




