कन्हान नदीपात्रात आढळला प्रतापनगरातील महिलेचा मृतदेह : आत्महत्या की घातपात? तपासाला वेग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : प्रतापनगर परिसरातील रहिवासी असलेल्या अश्विनी ऊर्फ आशी डे यांचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्यामागे घातपात आहे, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. यानंतर कन्हान नदी परिसरातही सखोल तपास करण्यात आला. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी ऊर्फ आशी डे या यापूर्वी खामला परिसरात वास्तव्यास होत्या. त्यानंतर त्या एका कथित एमडी विक्रेत्याच्या संपर्कात आल्याची आणि त्याच्यासोबत मनीषनगर-बेसा परिसरात राहत असल्याची चर्चा आहे. घटनेपूर्वी त्या एका व्यक्तीच्या वाहनात बसलेल्या दिसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आशी डे यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर संबंधित वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. वर्षभरापूर्वी सदर परिसरातील एका तरुणासोबत त्यांचा वाद झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. तसेच कन्हान येथील एका पुरुष मित्रासोबतही त्यांचे मतभेद सुरू होते आणि त्या संदर्भात तक्रार नोंदविण्यात आल्याची चर्चा आहे.
याशिवाय, अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये त्या पोलिसांना माहिती पुरवत असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, या दाव्याला पोलिसांनी कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही. तपास पूर्ण होईपर्यंत अशा चर्चांकडे सावधपणे पाहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरू शकणारा आशी डे यांचा मोबाइल फोन अद्याप सापडलेला नाही. पोलिसांकडून मोबाइलचा शोध सुरू असून त्याचे कॉल डिटेल्स, लोकेशन, संपर्कातील व्यक्ती तसेच अन्य तांत्रिक माहितीची सखोल तपासणी केली जाणार आहे. तपासाच्या दृष्टीने मोबाइलमधील माहिती महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या हा मृत्यू अपघात, आत्महत्या की घातपात, यापैकी नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपासाची दिशा निश्चित होणार असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू ठेवला आहे.
News - Nagpur




Petrol Price




