महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन सोहळ्याची तयारी वेगात


- मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रशासनाची जय्यत तयारी; विभागांना जबाबदाऱ्या निश्चित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्ह्यात उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांच्या नियोजनाला वेग आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 

निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपजिल्हाधिकारी लीना फलके, अधीक्षक रोहिणी पाठराबे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रमस्थळी आवश्यक सुविधा आणि विभागनिहाय जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.

ते म्हणाले, स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ यंदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी परस्परांशी उत्तम समन्वय राखून सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडाव्यात. कार्यक्रमात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. बैठकीत मुख्य ध्वजारोहण सोहळा, पोलीस व गृहरक्षक दलाचे संचलन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य पथकाची नियुक्ती, स्वच्छता व्यवस्था आणि विद्युत व्यवस्थेसह विविध महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करून स्वातंत्र्य दिनाचा सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमाची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, सर्व यंत्रणा या राष्ट्रीय सोहळ्यासाठी सज्ज होत आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos