महत्वाच्या बातम्या

 रेल्वे स्थानक परिसरातून अवैध मद्यसाठा जप्त : बिहारमधील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकाच्या मालधक्का परिसरात अवैधरित्या देशी व विदेशी मद्यसाठा विक्रीसाठी ठेवणाऱ्या बिहारमधील दोन तरुणांवर बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करून १२ हजार ५२० किमतीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (ई) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी बल्लारपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना मुखबिरामार्फत रेल्वे स्थानकाच्या मालधक्का परिसरात दोन व्यक्ती बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा विक्रीसाठी ठेवून असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.

या कारवाईदरम्यान राहुलकुमार मिथिलेश पासवान २६ वर्ष रा. मुजफ्फरपूर, बिहार आणि दशरथकुमार जयदयाल पासवान २८ वर्ष रा. मुजफ्फरपूर, बिहार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता २५ नग देशी दारूच्या बाटल्या, ४८ नग विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच २४ टिन बिअर असा एकूण १२ हजार ५२० किमतीचा मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार विकास जुमनाके, सत्यवान कोटनाके, पोअं महेश कुकुडकर, मिलिंद आत्राम व सहकाऱ्यांनी केली





  Print






News - Chandrapur




Related Photos