गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा


- गोंडवाना सैनिकी विद्यालयात विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; स्वयंशासन स्पर्धेसह शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करून शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसाचे विशेष नियोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या परिपाठाने करण्यात आली. विशेष म्हणजे, नेहमी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारा सकाळचा परिपाठ या दिवशी समस्त शिक्षक वर्गाकडून करून घेण्यात आला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत परिपाठात सहभाग घेतला.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिस्त, स्वयंनियंत्रण, जबाबदारी आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशासनाची भावना रुजविणे, जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.
स्वयंशासन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाचे व कामगिरीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
शिक्षक दिनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक व उत्साहवर्धक स्पर्धांचेही आयोजन केले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचे नियोजन, आयोजन व संचालन केले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या दैनंदिन शैक्षणिक कार्यातून आनंददायी विरंगुळा अनुभवला.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या या प्रेमळ सन्मानामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमातून शिक्षक-विद्यार्थ्यांमधील स्नेह, आपुलकी, जिव्हाळा आणि परस्पर सन्मानाचे नाते अधिक दृढ झाले. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरला.
विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यवेक्षक अजय वानखेडे सर यांच्या सहकार्याने शिक्षक दिनाचा हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचा अभिमान या भावनेतून शिक्षक दिनाचा कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात साजरा करण्यात आला.




Petrol Price




